
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून बुधवारी सकाळी पुण्यात एक कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या 18 तर महाराष्ट्रातील आकडा 42 वर पोहोचला आहे. पुण्यात आढळलेल्या या रुग्णाने फ्रान्स व नेदरलँड्स या देशात प्रवास केल्याचा रेकॉर्ड आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली असून एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
Naval Kishore Ram, District Magistrate of Pune, Maharashtra: One more person has tested positive for #Coronavirus in Pune. The person has travel history to France and Netherlands. Total number of positive cases reaches 18 in Pune and 42 in Maharashtra. pic.twitter.com/TqENpcImnl
— ANI (@ANI) March 18, 2020
बुधवारी झाला एकाचा मृत्यू
देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाने मंगळवारी महाराष्ट्रात पहिला बळी घेतला. 5 मार्च रोजी दुबईहून परतलेल्या घाटकोपर येथील 64 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. घाटकोपर येथील 64 वर्षीय वृद्ध व्यक्ती 5 मार्च रोजी दुबईहून परतला होता. 8 मार्च रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे आढळल्यानंतर तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्या 82 कर्मचाऱयांनाही वेगळे राहण्यास सांगण्यात आले होते. या रुग्णाची पत्नी तसेच मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या
- पिंपरी-चिंचवड 10
- पुणे 8
- मुंबई 7
- नागपूर 4
- यवतमाळ 3
- कल्याण 3
- नवी मुंबई 3
- रायगड, ठाणे, नगर, संभाजीनगर – प्रत्येकी 1
जगभरात 24 तासात 14 हजार लोकांना लागण
चीनमधून डोके वर काढलेल्या कोरोना विषाणूने एक-एक करीत जगभरात हातपाय पसरले आहेत. कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाची 14 हजार लोकांना लागण झाली. त्यामुळे जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख 75 हजार 536 वर पोहोचली आहे. याचवेळी जगभरातील बळींचा आकडा सात हजारांवर गेला आहे.






























































