अन्नाच्या अनमोल घासाची किंमत कळली

755

>> आशुतोष गोखले (अभिनेता)

लॉकडाऊन काळातही रिकामा बसलो नव्हतो. ‘खाना चाहिए’ या समाजसेवी संस्थेबरोबर कार्यरत होतो. हे काम करताना अन्नाच्या एका घासाची लाखमोलाची किंमत समजली.

लॉकडाऊनच्या काळात ‘खाना चाहिए’ या एनजीओबरोबर काम करत होतो. मुंबईतल्या झोपडपट्टय़ा, रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी जाऊन जेवण वाटत होतो. मुंबईत राहणारे जे कामगार चालत निघाले होते. त्यांना खाणे, रेशनवाटपाचं काम बंदीच्या काळात केलं. यावेळी बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचा शर्ट. आत कपडे वेगळे आणि त्यावर फुल स्लिव्हजचा शर्ट, जॅकेट घालायचो. शूजवरही प्लॅस्टिक घातलेलं असायचं. नेहमीप्रमाणे मास्क, सॅनिटायझर हे वापरायचोच. घरी गेल्यावर घराबाहेरच गरम पाण्याच्या बादलीत घातलेले कपडे भिजवायचो. मग आंघोळ करून घरात वावरायचो.

ज्या एनजीओसोबत काम करत होतो त्यांच्याकडून मी प्रवासाकरिता वापरत असलेल्या गाडीचंसुद्धा सॅनिटायझेशन व्हायचं. सध्या चित्रीकरण सुरू झालंय. तिथेही आमची संपूर्ण गाडी आतून बाहेरून सॅनिटाइझ केली जाते. सीन करताना मास्क काढावा लागतो. पण इतर वेळी मास्क घालूनच आम्ही वावरत असतो. प्रत्येक जण आपापल्या मेकअप रूममध्ये थांबतात. फार बाहेर इतरांमध्ये मिसळत नाहीत.

कोरोना काळात एनजीओबरोबर काम करताना दिनक्रम व्यस्तच होता. त्यामुळे व्यायाम करायला वेळ मिळाला नाही. पण आहार घरचाच असायचा. घरूनच दोन वेळचा डबा सोबत ठेवायचो.

प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो. त्यामुळे खूप वेगवेगळे अनुभव आले. खूप वाईट परिस्थितीतून लोक जात होते. त्यांची घरी जाण्याची धडपड बघितली. यामध्ये चालत बिहारला जायला निघालेला एक मुलगा भेटला. 20 वर्षांचा होता. मला तो खारेघर टोलनाक्याला भेटला. तो दोन दिवसांनी चालत कळव्यापर्यंत पोहोचला होता. मी त्याला खायला दिलं तर तो रडायला लागला. मला म्हणाला, दोन दिवसांनी पहिला घास माझ्या पोटात गेला. काहीही न खाता तो फक्त चालत होता. यापुढेही त्याच्या गावापर्यंत चालत जाणार होता. त्याची चौकशी केल्यावर कळलं की, तो सहा वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. धोबीघाटात काम करत होता. जेव्हा इथे आला तेव्हा तो 13 वर्षांचा होता. कारण त्याला घरी पैसे पाठवता येत होते. पण आता मला या शहराची भीती वाटते. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. हा किस्सा लक्षात राहिला कारण, हे कामगार ज्यांच्याकडे कामाला होते, त्यांना सांभाळणं ही त्यांच्या मालकांची जबाबदारी होती. खूप लोक भेटले, त्यांचे अनुभव ऐकले. विचित्र परिस्थितीतही ते खूश कसे राहतात हे त्यांच्याकडून ऐकता आलं.

काळाने काय शिकवलं?

या काळाने काय शिकवलं? यावर असं सांगावंस वाटतं की, आपण स्वतःचं काम, स्वतःची माणसं, स्वतःचं आरोग्य, शरीर या सगळ्याच गोष्टींना खूपच गृहीत धरतो हे चुकीचं आहे. इतकं गृहीत धरू नये. कधी काय परिस्थिती ओढवेल सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट जाणवली, या बंदीच्या काळात आपण खूप नशीबवान आहोत. तसेच आपल्या गरजा खरं तर कमी आहेत, पण आपणच त्या वाढवून ठेवल्या आहेत. ज्या गरजा वाढवल्या आहेत त्या सगळ्या आवश्यक आहेतच असे नाही. ज्यांना आम्ही भेटलो तर त्यांची गरज म्हणजे दोन वेळचं जेवण एवढीच होती. तेवढं मिळालं तरी ते खूश असतात आणि त्यांचं सुरळीत सुरू राहतं. आपल्या अशा काय वेगळ्या गरजा असतात. कमीत कमी गरजा ठेवून आपल्याला जगता येऊ शकतं. त्या लोकांच्या मानाने आपण नशीबवान आहोत. कारण आपल्या डोक्यावर छप्पर आहे, घरी व्यवस्थित खायला मिळतं. सपोर्ट करणारे आईवडील आहेत. आपण नशीबवान आहोत, कारण सगळ्यांकडे या बेसिक गोष्टीसुद्धा नाहीत. हे या काळात काम करताना तीव्रतेने जाणवलं. त्यामुळे माझ्या स्वतःत माणूस म्हणून बदल झाला.

कोरोना सेंटर्स

  • शिवम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर रोड, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, डॉ. अजय सिंग 9892807700.
  • आयुर हॉस्पिटल, चिंचपाडा गाव, बालाजी ज्वेलर्सजवळ, कल्याण पूर्व, डॉ. नरेश म्हात्रे 9867959999.
  • नोबेल हॉस्पिटल, संत सावता माळी भाजी मंडई, उर्सेकर वाडी, डोंबिवली पूर्व. 0251- 2860041.
  • नोबेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बेजोड निवास, अडिवली तलावाजवळ, हाजी मलंग रोड, अडिवली, कल्याण (पूर्व) 7977669168.
  • रुबी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, 101, बिग बाजार बिल्डिंग, लोढा हेवन, डोंबिवली पूर्व 9823677776.

 

आपली प्रतिक्रिया द्या