दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

1833

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला असल्याने सरकार व पालिका प्रशासन युध्दपातळीवर काम करीत आहे. मात्र झोपडपट्टी व सोसायटी परिसरात अनेक खासगी दवाखाने जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची गैरसोय केली जात आहे. अशा बेजबाबदार डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. शिवाय झोपडपट्टी परिसरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. असे असताना अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने अचानकपणे बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे ज्या डॉक्टरांना पालिकेने दवाखाने सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा डॉक्टरांना पालिकेने नोटीस देऊन त्यांचे दवाखाने सुरू करण्यास आदेशीत करावे. मात्र नोटीस दिल्यानंतरही जे डॉक्टर दवाखाने सुरु करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आज आयोजित केलेल्या बैठकीत सुरक्षेसाठी आवश्यक अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या बैठकीत, सर्वपक्षीय सदस्यांनी कोरोनामुळे 3 – 3 फुटांच्या अंतरावर खुर्चीत बसून व तोंडाला मास्क लावून या बैठकीत सहभाग घेतला. तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी व महापालिका चिटणीस यांनीही तोंडाला मास्क लावून या बैठकीत भाग घेतला.

भाजपचे नाहक राजकारण

मुंबईकरांच्या हितासाठी अत्यावश्यक असणारे आणि आरोग्यविषयक प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक आरोग्य आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या कामांच्या महत्त्वाच्या 14 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र भाजपने मात्र ‘लॉकडाऊन’ असल्याचे सांगत बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपची ही भूमिका म्हणजे केवळ राजकारण असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. ‘लॉकडाऊन’, 144 कलमाची अंमलबजावणी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी असते, कार्यालयीन अत्यावश्यक कामांसाठी नसते हे माहीत असूनही पोलिसात तक्रार करणे म्हणजे भाजपचा भ्रमिष्टपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या