आनंदाची बातमी! पिंपरीतील 3 कोरोनाग्रस्तांचे रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह

696
फोटो- प्रातिनिधीक

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे पहिले पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पुरुष रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. शहरवासीयांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे. गुरुवारी त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने आणखीन एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येणार आहेत. हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी हे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाबधित हे पहिले रुग्ण होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली नाहीये. या पहिल्या पॉझिटिव्ह तीन रुग्णांचे 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी आणखीन एकदा या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 6 संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी दहा जणांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले होते. तर, कोरोना बाधित असलेल्या 12 जणांची प्रकृती स्थिर आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नाही जी शहरवासीयांसाठी ही दिलासायदक बाब आहे.

आपली प्रतिक्रिया द्या