फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

884

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. ‘फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडू नका. कृपया घरातच रहा, सुरक्षित रहा,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. राज्यावर आलेलं हे संकट मोठ आहे. करोनाचा विषाणू जिथे अद्याप पोहोचलेला नाही तिथे आपल्याला तो पोहोचू द्यायचा नाही. त्यासाठीच सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, यातून शेतकऱ्यांना शेतावर येणे जाणे आपण बंद केलेले नाही. शेतमालाची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

पोलिसांनी काल एक मोठं काम केलं आहे. त्यांनी धाड टाकून काही लाख मास्क जप्त केले आहेत. मला पोलिसांचे कौतुक करायचे आहे. ही अशीच कामगी आपल्याकडून अपेक्षित आहे. राज्यावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करु नये. या काळात कोणीही काळाबाजार करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यावसायिकांना केले आहे.

हे रक्तदान करायचे दिवस आहेत

हे दिवस रक्तपुरवठा, रक्तदान करण्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी रक्तदानाची शिबिरे या काळात होत असतात. हे संकट आल्यामुळे आपल्याकडे काही प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सर्व बाजूंनी या संकटावर मात करण्यासाठी हात पुढे येत आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. आपण सगळे एकजुटीने या संकटाला सामोरे जावूया व त्यावर मात करूया, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या