
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
दुष्काळात पाण्याची ‘किंमत’ कळते. तहानलेल्या भागात तेजीत आलेला पाण्याचा बाजार तेज दाखवतो. पाणी टंचाईचे संकट पाणी पुरविणाऱ्या काही जणांसाठी इष्टापती ठरले आहे. यातून ग्रामीण भागात व अहमदपूर शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय जोमाने फोफावला असला तरी दुसरीकडे काही जण मात्र माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत.
अहमदपूर शहरात पाण्यासाठी नागरिकाचे हाल सुरू आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकावर आली असल्यामुळे येथील परिस्थिती पाहून पंचायत समिती सभापती आयोध्या ताई केंद्रे व जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या संकल्पनेतून अहमदपूर शहर व तालुक्यातील ग्रामस्थांना गेली महिनाभर झाले दररोज दोन टँकरने पाण्याचे मोफत वितरण केले जात आहे.
गाव परिसरातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने ते आपल्या स्वखर्चातून लिंबोटी धरणात दोन बोर घेऊन मोटारी बसवून ग्रामस्थांना दररोज दोन टँकरद्वारे 15 हजार लिटर पाणी मोफत पुरवीत आहेत. अहमदपूर शहरातील तालुक्यातील सर्व गावा-गावातील विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. महिलांना दीड किलोमीटरवर लांब पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही जण त्यापेक्षा दूरवरून पाणी आणतात. परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.



























































