
>> नवनाथ शिंदे
पुणे शहरातील विविध भागात कार्यरत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे. त्यासोबतच वाहन चालकांसोबत आदरयुक्त संवाद साधून वादविवादाचे प्रसंग टाळावे, यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना सौजन्य वर्तुणूकीचे धडे देण्यात येत आहेत. वाहतूक मुख्यालयात दररोज 40 जणांना दोन सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऑनड्युटी नागरिकांशी सुंवाद कसा साधावा, वाहतूक नियमनासंदर्भात प्रबोधनासह स्वतःची काळजी घेण्याबाबत धडे दिले जात आहेत.
वाहतूक कर्मचाऱ्यांचे दंडात्मक कारवाईसह विविध कारणांवरून नागरिकांसोबत वादविवाद होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे प्रकरण पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचत होते. त्यापार्श्वभूमीवर कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात सुसंवाद राहिल्यास वादविवादाचे प्रसंग टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बिहेव्हीयर सायन्सअंतर्गत वाहतूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कर्मचाऱ्यांच्या वागणूकीबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूक विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना सौजण्याचे धडे देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशकांच्या मदतीने वाहतूक कर्मचाऱ्यांना सौजन्याचा बुस्टर दिला जात आहे.
रागावरील नियंत्रण, शाब्दिक वाद नियंत्रणाचे प्रशिक्षण
वाहतूक मुख्यालयात दररोज 40 कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेषतः चौकाचौकात ऑनड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रागावरील नियंत्रण, शाब्दिक वाद, सभ्य भाषेतील संवादाचे धडे शिकविले जात आहेत. कौटुंबिक वादावादी, आजारपण, मानसिक ताण-तणाव टाळून ऑनड्युटी ताजेतवाणे कसे राहता येउ शकते, याचेही मार्गदर्शन केले जात आहे. त्याशिवाय वादविवाद टाळून वाहतूक नियमन करण्यास प्राधान्य देण्यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक सुरळित ठेवण्यासोबतच कर्मचाऱ्यांचा नागरिकांसोबत सुसंवाद असावा, यासाठी सर्वच वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना सौजण्याचे धडे देण्यात येत आहेत. त्यानुसार मानसिक ताण-तणाव, राग-चिडचीड टाळण्यासाठी संबंधितांचे समुपदेशन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी एकमेकांसोबत सभ्यता बाळगल्यास सौदर्याचे संबंध निर्माण होण्यास मदत होणार आहे.
– राहूल श्रीरामे, वाहतूक उपायुक्त






















































