कोरोनाचे सावट आणि ऑलिम्पिक

अवघ्या क्रीडा विश्वासह संपूर्ण जगाचे लक्ष सध्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकवर लागून राहिले आहे. येथील क्रीडा नगरीत खेळाडूंची रेलचेल सुरू झाली असून आयोजकांनीदेखील पंबर कसली आहे. पण कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची धाकधूक वाढल्याचे चित्र सध्या क्रीडा नगरीत दिसून येत आहे. कोरोनामुळे अगोदरच ही स्पर्धा प्रेक्षकांविना भरविण्यात येत आहे. त्यात आता वाढत्या कोरोनाची दहशत लक्षात घेता ही स्पर्धा नेमकी कशी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या जवळपास 125 वर्षांच्या इतिहासात प्रेक्षकांविना ऑलिम्पिक पार पडण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह खेळाडू, आयोजक आणि स्थानिकांमध्ये तशी नाराजी पसरली आहे, अनेकांनी तशी ती बोलून दाखविली आहे. ऑलिम्पिकला अधिकृतरीत्या सुरुवात होण्याअगोदर नुकताच याठिकाणी एक सॉफ्टबॉलचा सामना पार पडला. या सामन्यानंतर ही नाराजी आता उफाळून येत असल्याचे चित्र टोकियोमध्ये पाहायला मिळत आहे. मुळात टोकियोमध्ये अनेक वर्षांनंतर ऑलिम्पिकचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र कोरोनाने त्यावर विरजण टाकले. जवळपास एक वर्ष उशिराने सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिकसाठी प्रशासनाने आपले सर्वस्व पणाला लावले. टोकियो येथे 2011 येथे मोठा भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत टोकियोने यंदाच्या ऑलिम्पिकचे आयोजन केले. मात्र कोरोनामुळे यंदाचा हा ऑलिम्पिक हा कोणत्याही कार्निव्हल आणि उत्सवाशिवाय, मनोरंजनाशिवाय पार पडत असल्याने याठिकाणी नेहमीच्या ऑलिम्पिकसारखा फेस्टिव्हल मूड दिसून येत नसल्याने निराशा व्यक्त केली जात आहे.  ‘ऑलिम्पिकचे पुनर्निर्माण’ ही यंदाच्या ऑलिम्पिकची थीम होती. मात्र कोरोनाने त्यावरही पाणी फेरले आहे. त्याचे पडसाद फुकूशिमा येथील अझुमा स्टेडियममध्ये पार पडलेल्या जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सॉफ्टबॉलच्या सामन्यात दिसून आले.  या सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमला अक्षरशŠ पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुळात भूकंपाच्या धक्क्यातून उभा राहिलेला टोकियो जगासमोर आणण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे मानले जात होते. मात्र प्रेक्षकांशिवाय सामना रंगणार असल्याने निराशाच पसरली असल्याचे मत फुकूशिमा सिटी सॉफ्टबॉल असोसिएशनचे सिईची अनाबी यांनी व्यक्त केले. पण सॉफ्टबॉलचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाल्याने या खेळाची लोकप्रियता वाढेल, असा विश्वासदेखील त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केलाय.

एकीकडे निराशा असली तरी कोरोनाकाळात ही ऑलिम्पिक खेळविला जात असल्याने येथील स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीदेखील कोरोनाचे आयोजन केल्याने इतिहासात त्याची नोंद राहील, असा विश्वास येथील स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर या स्पर्धेत जपानचे स्पर्धक सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा येथील स्थानिकांकडून सध्या व्यक्त केली जात आहे. जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा हेदेखील ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत उत्सुक आहेत. बंद स्टेडिअममध्ये प्रेक्षकांविना यंदाची स्पर्धा होणार असली तरी देशातील जवळपास 4 अब्ज जनतेच्या घराघरात ही स्पर्धा पाहिली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून भूकंपानंतर उभा राहिलेला टोकिया जगासमोर येईल, असा विश्वास यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केलाय.

एका खेळाडूची स्पर्धेतून माघार

टोकियोत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. स्पर्धा सुरू होण्याअगोदरच एका अॅथलेटिक्सला कोरोनाची लागण झाल्याची घटना नुकतीच समोर आली. खेळाडूला स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदरच ही घटना घडल्याने कोरोनाचे सावट किती गडद असल्याचे लक्षात येते. त्यामुळे स्पर्धेदरम्यान नेमकी कोणती परिस्थिती येते याकडे उभ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

  • 1956 साली मेलर्बन येथे पार पडलेले ऑलिम्पिक देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यावेळी प्राणी विलगीकरण कायद्यामुळे बरीच टीका झाली होती. पण अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती.
  • 1972 मुनीच येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात इस्त्र्ाायलच्या 11 खेळाडूंची हत्या करण्यात आली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासातील हा काळा दिवस मानला जातो.
  • 1996 मध्ये अटलांटा येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धे दरम्यानच ऑलिम्पिक पार्क येथे बॉम्बहल्ला झाला होता. मात्र अशा भयंकर परिस्थितीनंतरही प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक पार पडण्याचे यंदाचे हे पहिलेच वर्ष असल्याचे ते सांगतात.

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

असे असले तरी टोकियो येथे यंदाचे ऑलिम्पिक पार पडत आहे. हजारोंच्या संख्येत खेळाडू, प्रशिक्षक आणि इतरवर्ग याठिकाणी दाखल झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान देखील कोरोनाचा धोका अधिक असल्याचे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. या स्पर्धेदरम्यान किती जणांना कोरोनाची लागण होते, हे पाहणे गरजेचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक टिड्रोज अधानोम यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी टोकियो येथे दाखल झालेल्या आतापर्यंत 79 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचादेखील समावेश असल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत. ऑलिम्पिकचे आयोजन सुपर स्प्रेडर ठरण्याची भीतीदेखील येथील तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.  क्रीडा नगरीत जवळपास 11 हजारांहून अधिक खेळाडू असणार आहेत. त्यामुळे या दरम्यान कमीत कमी प्रमाणात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत ट्रिडोज अधानोम यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे. कोरोना संपला आहे, असे कोणीही समजू नये. तसे समजणे निक्वळ मूर्खपणा असेल त्यामुळे खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी आयोजकांना दिलाय. त्यामुळे आयोजक याबद्दल किती सतर्क राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काय सांगतो इतिहास

  • 1980 साली मकाव येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकवर युनायटेड स्टेट आणि त्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या अनेकांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. सोविएत युनियनच्या अफगाणिस्तानावरील आक्रमणामुळे हा बहिष्कार घालण्यात आला होता.
  • त्याशिवाय 1976 सालीदेखील आफ्रिका आणि डझनभर देशांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता. वर्णभेदाच्या मुद्दय़ावरून हा बहिष्कार घालण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेवर 1964 ते 1988 पर्यंत बंदीची कारवाई करण्यात आली होती.
  • प्रथम आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातदेखील 1916,1940 आणि 1944 ला ऑलिम्पिक रद्द झाले, पण प्रेक्षकांविना ऑलिम्पिक पार पडण्याची यंदाची ही पहिलीच वेळ.
  • फ्लूच्या महामारीत 50 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही 1920 ला बेल्जियम येथे ऑलिम्पिक पार पडले होते.
आपली प्रतिक्रिया द्या