
कोरोना काळात खासगी रुग्णालयांना चाप बसावा याकरिता राज्य सरकारने विविध प्रकारचे निर्बंध लावण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिह्यात बिले तपासण्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीने आत्तापर्यंत 75 लाख 44 हजार 808 रुपयांच्या अतिरिक्त बिलांना चाप लावल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे. दरम्यान, जिह्यात आजवर 30207 बिलांची पडताळणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळामध्ये खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांवर उपचार सुरू होते. या कार्यकाळामध्ये अनेक रुग्णालये अवाजवी बिले घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने कठोर पावले उचलून जिल्हाधिकाऱयांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने एक उपजिल्हाधिकारी तसेच लेखा विभागातील अधिकाऱयांची नियुक्ती या पथकात केली होती.
नगर जिह्यात अनेक खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले घेतल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या महिनाभरापासून या बिलांची पडताळणी सुरू होती. यात आत्तापर्यंत 30 हजारांहून अधिक बिलांची तपासणी करण्यात आली आहे. लाखो रुपये जास्त लावल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्ण वाढल्याने जिह्यातील खासगी 239 रुग्णालयांत रुग्णांवर उपचारास मान्यता देण्यात आली होती. नगर शहरात सर्वाधिक 66 रुग्णालये आहेत. जिह्यात रुग्णसंख्येत दुसऱया क्रमांकावर संगमनेर तालुका राहिला. तेथे खासगी 46 रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू होते.
कोविड उपचाराची परवानगी दिलेली तालुकानिहाय रुग्णालये
राहुरी 15, श्रीरामपूर 16, नेवासे 9, नगर तालुका 7, संगमनेर 46, अकोले 4, राहाता 16, कोपरगाव 9, जामखेड 8, कर्जत 6, श्रीगोंदे 11, पारनेर 12, पाथर्डी 5, शेवगाव 9.
निम्म्या बिलांचे ऑडिट बाकी
जिल्हा प्रशासनातर्फे 30 हजार 207 रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करण्यात आले आहे. आणखी 34 हजार 189 बिलांचे ऑडिट होणे बाकी आहे. ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेत दोन हजार 400 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. संगमनेर तालुक्यात या योजनेत सर्वाधिक एक हजार 45 लाभार्थींवर उपचार करण्यात आले.



























































