मी घडवलेल्या नजाकतीच्या वस्तू

>>वैष्णवी पाटील (गोरेगाव)

लहानपणापासूनच कागदाची फुलं, वेगवेगळ्या वस्तू पाहून त्या आपणही कराव्या असं मला वाटायचं. कागदाच्या वस्तूंमध्ये मी हरवूनच जायचे. त्यातच रमायचे. दुसऱयांनी केलेल्या क्राफ्टच्या वस्तू पाहायलाही मला खूप आवडायचं. मग हळूहळू मीही त्या करायला लागले. शाळेत क्राफ्ट बनवायची असली की मी प्रचंड उत्साहात असायचे. छान छान वस्तू बनवायचे. शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक वस्तू मन लावून करायचे. शिक्षकांनीही माझी कला पाहिली आणि मला वेळोवेळी उत्तेजन दिले. वडील कलासक्त आणि आई विणकाम करणारी त्यामुळे आमच्या घरात एकूणच वातावरण कलाक्षेत्राला पोषक असेच आहे. रंगीबेरंगी आहे. आम्हाला कलेची आवड असल्यामुळेच आम्ही सगळेजण नेहमी हसत असतो. आनंदी राहातो.

सध्या मी मालाडमधल्या घनःश्याम सराफ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. किचकट आकडेमोड करायला जराही आवडत नाही, पण त्यातच पुढे नोकरी करावी लागणार असल्याने तो अभ्यासही मी करतेच आहे, पण क्राफ्टमध्ये (पेपर क्विलिंग) करीयर करता येईल तर मला खूपच आनंद होईल. कागदाच्या नाजूक कलाकृती बनवताना मनाला इतकं समाधान मिळतं की सांगण्याची सोय नाही. मग त्यातच करीयर केलं तर किती बरं होईल. तरी बरं… माझे वडील माझ्या वस्तू विकल्या जातील यासाठी खटपट करतात. त्यांच्या खूप ओळखी असल्यामुळे मला अनेक ऑर्डर्सही ते मिळवून देत असतात. माझ्या वस्तू विकत घेऊ शकतील अशा नवनव्या व्यक्तींशी माझ्या ते ओळखी करून देतात. त्यामुळे माझ्या वस्तू हातोहात विकल्याही जात आहेत. माझ्या हातखर्चाला तो पैसा उपयोगी पडतो. माझी आई विणकाम करते. तीसुद्धा मला कलाकृती बनवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया देत असते.