
ऑस्ट्रेलिया दौऱयावरील अपयशानंतर मला ‘टीम इंडिया’तून बाहेर काढण्यात आले. मात्र मायदेशात परतल्यानंतर मी प्रवीण अमरे सरांकडे गेलो. त्यांच्याकडून फलंदाजी तंत्रातील त्रुटीबाबत मार्गदर्शन घेतले. देशांतर्गत क्रिकेट खेळलो. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत मला त्याचा फायदा झाला. आयपीएलमधील सलामीच्याच लढतीत चांगली फलंदाजी करता आली असल्यामुळे आनंदी आहे. आता माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली पॅपिटल्स संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉने दिली.
शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉने
38 चेंडूंत 72 धावांची खेळी केली. विजयानंतर बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, दुसऱया डावात फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टी चांगली होती. बॅटवर चेंडू व्यवस्थित येत होता. त्यामुळे चांगली फलंदाजी करू शकलो.
मनोबलही उंचावले
‘टीम इंडिया’तून गच्छंती होणे माझ्यासाठी निराशाजनक होते. पण त्यानंतर मी प्रवीण अमरे सरांसोबत माझ्या फलंदाजीबाबत चर्चा केली. स्थानिक क्रिकेटमध्ये प्रवीण अमरे सरांचे मार्गदर्शन कामाला आले. मी माझ्या फलंदाजीतील त्रुटींमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचा मला चांगला फायदा झाला असून मनोबलही उंचावलेले आहे. प्रवीण अमरे सरांच्या मार्गदर्शनामुळेच माझा कायापालट झाला, असे पृथ्वीने सांगितले.
गावसकरांसह दिग्गजांकडून काैतुक
पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीचे काैतुक दिग्गजांकडून करण्यात आले. हिंदुस्थानचे माजी महान फलंदाज सुनील गावसकरांसह कृष्णम्माचारी श्रीकांत, वीरेंद्र सेहवाग, हर्ष भोगले यांनीही मुंबईकर फलंदाजाच्या फलंदाजीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. सुनील गावसकर यावेळी म्हणाले, पृथ्वी शॉच्या फलंदाजीत झालेला बदल वाखाणण्याजोगा आहे. प्रवीण अमरे यांच्यामुळे हा बदल झाला असेल तर ही आनंदाची बाब आहे.






























































