गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर विंडीजचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नॉटिंगॅहम

गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ उद्या वर्ल्ड कपमधल्या लढतीत वेस्ट इंडीजला सामोरा जाणार आहे. ऍरोन फिंचच्या नेतृत्वाखाली सलामीच्या लढतीत कांगारूंनी अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. पण त्यांच्यासमोर पाकिस्तानचा धुव्वा उडवणाऱ्या विंडीजचे आव्हान असणार आहे. त्यामुळे निष्काळजी खेळ करून त्यांना चालणार नाही. वर्ल्ड कपसारख्या प्रतिष्ठsच्या स्पर्धेतील कोणताही सामना हा कमी महत्त्वाचा नसतो. तसेच कोणत्याही संघाला कमी लेखणे ही मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे उद्या दोन गतविजेत्या संघांमध्ये होणारी लढत रोमहर्षक ठरल्यास आश्चर्य वाटायला नको.

ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये उद्या होणाऱ्या लढतीत पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडू शकतो. यजमान इंग्लंडने एका डावात 481 धावांचा डोंगर उभारलाय. येथील खेळपट्टी फलंदाजांना पोषक अशीच तयार करण्यात आलीय. अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी सामना पूर्ण होईल असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

येथे होणाऱ्या लढतीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. फलंदाजांना नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणारा संघ बहुतांशी वेळा जिंकलाय. इतिहास हेच सांगतोय. दोन्ही संघांची यावर करडी नजर असेल.

वर्चस्व कोणाचे…

वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी आखूड टप्प्यांचे चेंडू टाकून पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवले. आता त्यांना ऍरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीवन स्मिथ यांना रोखावे लागणार आहे. तसेच मिचेल स्टार्क ऍण्ड कंपनीला ख्रिस गेल, शेमरोन हेथमायर, निकोलस पुरण, जेसन होल्डर यांच्यावर वर्चस्व गाजवावे लागणार आहे. उद्याच्या लढतीत कोणता संघ वर्चस्व राखतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

  • आजची लढत- ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज
  • नॉटिंगहॅम, दुपारी 3 वाजता