
वर्ल्ड कपमध्ये एकामागोमाग धक्कादायक निकाल लागत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सावध झाली आहे. सलग दोन पराभवांनंतर ऑस्ट्रेलियाने स्वतःला सावरत सलग दोन विजय नोंदवलेत. आता ते हॅटट्रिकसाठी उतरणार असले तरी नेदरलॅण्ड्सला कोणत्याही दृष्टीने कमी लेखण्याची चूक करणार नाहीत.
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाची झळ बसल्याने ऑस्ट्रेलियाचे खच्चीकरण झाले होते, पण गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे ते पुन्हा ट्रकवर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर लाजीरवाणा पराभवाची नामुष्की लादली होती आणि याच आफ्रिकेला नमवण्याची किमया डच संघाने दाखवून वर्ल्ड कपमध्ये सनसनाटी निर्माण केली होती. आता डच ऑस्ट्रेलियासमोर उभा ठाकला आहे. सोमवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत आम्हीही पोहचू शकतो असे दाखवून दिलेय. त्यामुळे त्याच विजयापासून नेदरलॅण्ड्स प्रेरणा घेऊन दिल्ली जिंकण्यासाठी उतरणार आहे. सध्या तळाच्या संघाचा खेळ पाहता वर्ल्ड कपमध्ये आणखीन धक्के पाहायला मिळणार याची पूर्ण शक्यता आहे.
हेड डोके वर काढतोय
दुखापतीमुळे अद्याप संघाबाहेर असलेला ट्रव्हिस हेड फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे स्मिथ आणि लाबुशेनपैकी कुणी एक अपयशी ठरला तर पुढच्या सामन्यात हेडला संधी मिळाली तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. हेडची फिरकीही संघाला फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस या अष्टपैलूंची बॅट आणि बॉल दोन्ही अद्याप शांत आहे. नेदरलॅण्ड्सविरुद्ध ते आपला फॉर्म मिळवतील अशी
अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाच भारी
पहिले दोन सामने इतिहासजमा झालेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन दमदार विजय नोंदवलेत. त्यामुळे नेदरलॅण्ड्सविरुद्ध कोणताही धक्कादायक निकाल लागणार नाही याची खात्री पॅट कमिन्सला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श सुपर फॉर्मात आहेत. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि अॅडम झम्पाने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून सोडलेय. उद्याही त्यांचे चेंडू डचला गोंधळात टाकण्याची शक्यता आहे. फक्त ऑस्ट्रेलिया स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेनच्या फॉर्मची वाट पाहताहेत. स्मिथने गेल्या चार डावांत केवळ एकदाच तिशी ओलांडली आहे तर लाबुशेनला अद्याप एकही अर्धशतक नोंदविता आलेले नाही.
डचला पहिल्या विजयाची प्रतीक्षा
नेदरलॅण्ड्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदाही जिंकलेला नाही, पण सध्या ते भन्नाट खेळत आहेत. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना नेहमीच सतावले आहे. पण विक्रमजीत सिंह आणि मॅक्स ओडाऊड यांचे अपयशही संघाला त्रासदायक ठरलेय. फक्त एक जमेची बाजू म्हणजे त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत सर्वच संघांच्या फलंदाजांचा घामटा काढलाय. उद्याही त्यांच्याकडून सनसनाटी कामगिरी अपेक्षित आहे.




























































