वाकडीची घटना वाईटच, दोषींना शिक्षा झाली पाहिजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

जामनेर तालुक्यात पोहण्याच्या कारणावरून दोन मातंग तरुणांची धिंड काढण्यात आली. ही घटना अतिशय निंदनीय असून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. महाजन यांनी आज वाकडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेला विरोधकांकडून राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे ईश्वर जोशी यांच्या शेतातील विहिरीत मातंग समाजाचे सचिन चांदणे व राहुल चांदणे हे दोघे पोहण्यासाठी उतरले. याच वेळी जोशी यांचा सालदार प्रल्हाद लोहार हा तेथे आला. त्याने या दोघांना पकडून त्यांचे कपडे काढून घेतले आणि त्यांना बेदम मारहाण करत त्यांची धिंड काढली. ईश्वर जोशी याने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना १० जून रोजीची आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ येताच खळबळ उडाली. पीडित मुलांची आई दुर्गाबाई चांदणे यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ईश्वर जोशी व प्रल्हाद लोहार यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वाकडी येथे जाऊन चांदणे कुटुंबाची भेट घेतली. घटनेतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे असे ते म्हणाले. या घटनेला विरोधक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही महाजन यांनी केला.

अब्दुल सत्तार यांना रोखले

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे मोठा लवाजमा घेऊन सकाळीच वाकडीत दाखल झाले. या राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात आल्याबद्दलही त्यांनी थयथयाट केला, मात्र गावकऱयांनी त्यांना वेळीच रोखले. आमच्या गावात अनेक वर्षांपासून कोणताही वाद झालेला नाही. येथे सलोख्याचे वातावरण आहे असे त्यांना ग्रामस्थांनी ठणकावले.

पीडित मुलांना न्याय द्या

वाकडी येथील घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील पीडित मुलांना न्याय देण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

संघ, भाजपाच्या विषारी राजकारणाविरुद्ध आवाज उठवा!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध ‘ट्विटर’वरून केला आहे. ‘महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा इतकाच होता की ते एका ‘सवर्ण’ विहिरीत आंघोळ करत होते. आज माणुसकीही आपली अस्मिता वाचवण्याचा निर्वाणीचा प्रयत्न करत आहे. संघ आणि भाजपाच्या अशा मनुवादी विद्वेषाच्या विषारी राजकारणाविरुद्ध आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही.’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.