
सामना ऑनलाईन । बहराइच
शौचाला गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला हात गमवावा लागला आहे.
बहराइच येथील दौलतपूर गावातील परमेश्वर बुद्धा धान हा तरुण आपल्या शेतात प्रातःविधी करण्यासाठी गेला होता. प्रातःविधी आटोपल्यानंतर तो पाणी आणण्यासाठी शेताजवळील तलावात गेला. तलावातील पाणी घेण्यासाठी त्याने हात तलावात टाकला असता त्याच्यावर टपून बसलेल्या मगरीने हल्ला केला. मगरीने तरुणाचा हात ओढण्यास सुरुवात केली. मगरीच्या हल्ल्यामुळे घाबरलेला परमेश्वर आरडाओरडा करू लागला.
त्याच्या आवाजाने तिथे इतर ग्रामस्थ धावत आले आणि त्यांनी परमेश्वरची सुटका केली. या हल्ल्यात परमेश्वरच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.





























































