इंग्लंडच्या युद्धनौकेसाठीचं अडीच कोटी रुपयांचे डिझेल चोरले, कडेकोट बंदोबस्तात असतानाही झालेल्या चोरीमुळे नौदल हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या इंधन चोऱ्यांपैकी एक चोरी उजेडात आली आहे. चोरांनी 250000 पाऊंड किंमतीचे (2,48,05,593 रुपये) अडीच लाखांचे डिझेल चोरले असून, धक्कादायक बाब ही आहे की हे डिझेल त्यांनी इंग्लंडच्या अतिविशाल युद्धनौकेसाठीसाठीचं होतं. बंदरात उभी असताना या युद्धनौकेभोवती अत्यंत कडक पहारा असतो. तरीही ही डिझेल चोरी झाल्याने नौदल अधिकाऱ्यांची जाम फजिती झाली आहे.

रशिया युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर सगळ्या देशांमध्ये वाढले आहेत. इंग्लंडमध्ये महागाईचं संकट झेलत असलेल्या नागरिकांना इंधन दरवाढीमुळे आणखी त्रास होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने चोरांनी मंदीत संधी साधत इंधनाची चोरी करण्यास सुरूवात केली आहे.

एक डिझेल टँकर बंदरातून बाहेर पडत असताना एका सैनिकाने संशय आल्याने तो अडवला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीतून या डिझेल चोरीचा उलगडा झाला. HMNB Devonport या प्लायमाऊथमधील नौदलाच्या तळावर ही डिझेल चोरी झाली आहे. एका लहान शहराला वीजपुरवठा करण्यासाठी जितकं इंधन लागतं तितकं डिझेल चोरण्यात आलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चोरीमुळे नौदलाचे अधिकारी भडकले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बोटीसाठीचं हे इंधन डिझेल कारसाठी वापरलं जाऊ शकतं हे माहिती असल्यानेच चोरांनी हे इंधन चोरलं आहे. या इंधनाचा वापर बोटीवरील जनरेटरसाठी केला जातो. जे इंधन चोरण्यात आलंय ते HMS Bulwark या युद्धनौकेसाठी होतं. जर आणीबाणीची परिस्थिती आली असती आणि या युद्धनौकेला तातडीने रवाना करण्याची वेळ आली असती तर अनर्थ ओढावला असता, कारण डिझेल नसल्याने जरनेटर चालले नसते, ज्यामुळे संपूर्ण युद्धनौका अंधारात लोटली गेली असती आणि विजेवर चालणारं एकही उपकरण चालू शकलं नसतं.