Curtis Campher Record – कॅम्फरचे पाच चेंडूंत पाच विकेट

आयर्लंडचा अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने आयर्लंड आंतर प्रुविन्शिअल टी-20 ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी सामन्यात मुन्स्टर रेड्स संघासाठी खेळताना नॉर्थ वेस्ट वॉरिअर्स संघाचे पाच फलंदाज सलग पाच चेंडूंत बाद करण्याचा दुर्मिळ विक्रम रचला. व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पाच चेंडूंत पाच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मुन्स्टर रेड्स संघाचा कर्णधार असलेल्या पॅम्फरने फलंदाजीत 24 चेंडूंत 44 धावा ठोकत संघाला 7 बाद 188 अशी दमदार धावसंख्या ओलांडून दिली. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग करणाऱया नॉर्थ वेस्ट वॉरिअर्सची 5 बाद 87 अशी अवस्था असताना कॅम्फरने आपल्या दुसऱया षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर दोन विकेट टिपल्या. त्यानंतर पुढच्या षटकात अ‍ॅण्डी मॅकब्राइनला बाद करत आपली हॅटट्रिक साजरी केली. मग त्याने पुढच्या दोन चेंडूंवर आणखी दोन विकेट टिपत प्रतिस्पर्ध्यांचा डाव 88 धावांवरच संपवला आणि 100 धावांनी दणदणीत विजय संपादला. त्याने  चार फलंदाजांना शून्यावरच बाद केले. कॅम्फरने 16 धावांत 5 विकेट टिपत विश्वविक्रमी पंचकाची किमया साधली. व्यावसायिक क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आजतागायत एकाही गोलंदाजाने सलग पाच चेंडूंत 5 विकेट टिपलेले नाहीत.