
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘राफेल’ विमानांचा करार दसॉल्टने स्वतःहून अनिल अंबानींच्या कंपनीची निवड केली असे स्पष्ट करतानाच आम्ही हिंदुस्थानसोबत काम करतो, कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही, असे उत्तर ‘दसॉल्ट’चे सीईओ एरिक ट्रपियर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिले आहे.
‘राफेल’ करारात घोटाळा झाला असून, फ्रान्सची कंपनी ‘दसॉल्ट’चे सीईओ खोटे बोलत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावर आज सीईओ एरिक ट्रपियर यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
मी खोटे बोलत नाही. तशी माझी ख्याती नाही आणि सीईओ पदावरील व्यक्तीला तसे करताही येत नाही. काँग्रेसने केलेले आरोप दुर्दैवी आहेत. पंडित नेहरू पंतप्रधान असताना 1953 मध्ये ‘दसॉल्ट’ने पहिला करार केला होता. त्यानंतर अन्य पंतप्रधानांबरोबरही आम्ही काम केले आहे, असे एरिक ट्रपियर यांनी म्हटले आहे.
‘राफेल’ निर्मितीचा एकही पैसा थेट रिलायन्सला जाणार नाही
रिलायन्सला फायटर जेट निर्मितीचा अनुभव नसताना करार केल्याच्या आक्षेपावर ट्रपियर म्हणाले, रिलायन्स हा दसॉल्टशी झालेल्या जॉईंट व्हेंचरचा एक भाग आहे. राफेल निर्मितीसाठी मिळणारा एकही पैसा थेट रिलायन्सला दिला जाणार नाही. तो जॉईंट व्हेंचरला जाणार आहे.





















































