
पुणे शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडीनंतर आता पोस्ट कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. वारजे माळवाडी, कोथरुड, हडपसरमध्ये चार घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज चोरुन नेला आहे. त्यामध्ये कंपनीचे कार्यालय आणि पोस्ट कार्यालयाचांही समावेश आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवणे येथे राहणारे संतोष बबन पासलकर यांचा वारजे चौक परिसरात फ्रॅब्रिकेशनचा कारखाना आहे. सोमवारी रात्री कारखाना बंद केल्यानंतर चोरट्यांनी कडी कुलूप तोडून कंपनीतील ग्रॅन्ड मशीन व वायर असा 45 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. दुसर्या घटनेत चोरट्यांनी वारजे चौकाजवळ राजू परशूराम वीर यांच्या वर्कशॉपचा पत्रा कापून ड्रॉव्हरमधील 46 हजार रूपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत चोरट्यांनी कोथरूडमधील लौकित सोसायटीतील गीता चॅटर्जी यांचा बंद फ्लॅट फोडला आहे. याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन मनोजकुमार शहा यांनी तक्रार दिली आहे. चौथी घटना हडपसर परिसरातील मांजरी फार्म पोस्ट ऑफीसचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. तिजोरी उघडता न आल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. याप्रकरणी पोस्ट मास्तर राहूल विठ्ठल जाधव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.





























































