
सामना ऑनलाईन । मुंबई
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत बॅन्जोच्या तालावर थिरकणारे गोविंदा… शिस्तबद्ध पद्धतीने थर रचून हंडीला दिलेली सलामी…आणि त्यानंतर होणारा एकच जल्लोष… मुंबई व उपनगरात उद्या सर्वत्र हेच चित्र दिसणार आहे. उद्या मोठ्या जल्लोषात राज्यभरात दहिहंडीचा सण साजरा होणार आहे. गेल्या महिनाभरापासून दहिहंडी पथकांचा सुरू असलेला सराव काल रात्री पूर्ण झाला. मोठ्या मोठ्या गोविंदा पथकातील गोविंदा ‘शोर मच गया शोर, देखो आया माखनचोर’ म्हणत आज रात्रीच निघणार आहेत. वरळी, ठाणे, दादर, गिरगाव अशा भागांमध्ये आज रात्रीपासूनच गोविंदाचा उत्साह बघायलाा मिळणार आहे.
नऊ, सात थर लावण्याची चढाओढ गोविंदा पथकांमध्ये दिसणार असली तरी गोविंदांच्या सुरक्षेसाठीही काळजी घेण्यात येणार आहे. ‘थरांची स्पर्धा करू नका, शून्य अपघाताचे लक्ष्य पाळा’ हा संकल्प यंदाही गोविंदांनी केला आहे. खासकरून वरच्या थरावरचा बालगोविंदा हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट घालूनच थरावर चढताना दिसतील. ठाणे, मुंबईत दहिहंड्यांवर लाखोंची बक्षिस लावण्यात येणार आहेत. गोपिकाही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोविंदांप्रमाणेच दहीहंडीचा सण साजरा करतील.






























































