मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्याबद्दल आनंदसोहळा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेने लाडू वाटून आनंद व्यक्त केला. दरवर्षी अंधेरी वृत्तपत्र सेनेतर्फे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी त्यांची मागणी होती. महाराष्ट्र सरकारने लक्झरी बसमध्ये एसटी सुंदरी ठेवण्यापेक्षा मराठी वर्तमानपत्रे ठेवल्यास प्रवाशांच्या ज्ञानात भर पडेल, मराठी भाषा वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष मधुसूदन सदडेकर, मधुमिता सदडेकर, रवींद्र चिले, अस्मिता चिले, एस. मुर्गन, पंकज भावे, संदीप बाणेकर, रवी संसारे, पाडावे, सचिन खांडेकर, नाना निरवडेकर, श्रीकांत कळसकर, शशिकांत शिर्के, रवी कड्डी उपस्थित होते.
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण मंगळवारी करण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वाळवी’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर ‘गुलमोहर’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली. पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी दिली. तर माझ्या दिसण्यावरून बोलले गेले, पण मी खचून न जाता स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मला कळले की दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार आहे तेव्हा खूप आनंद झाला आणि माझा विश्वास बसत नव्हता, अशी प्रतिक्रिया मिथुन चक्रवर्ती यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळ बैठक रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज प्रकृती बिघडल्याने राज्य मंत्रिमंडळाची बैठक तसेच त्यांचे आजचे दिवसभराचे शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हलका ताप आणि रक्तदाबामुळे शारीरिक थकवा जाणवू लागल्यानंतर ‘वर्षा’वर तातडीने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी शिंदे यांना तपासल्यानंतर विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
लोटस जेट्टीची दुरुस्ती करा!
वरळी येथील लोटस जेट्टीची नवरात्रीत देवींच्या विसर्जनापूर्वी दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन सहाय्यक अभियंता ऋषिकेश पाटील यांनी जेट्टीची पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. यावेळी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र काटकर, जी/द विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रीधर वाघराळकर उपस्थित होते.
क्लीन-अप वाहनाच्या धडकेत नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मदरशामधून घरी जाणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलाला पालिकेच्या क्लीन-अप वाहनाने धडक दिल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून अपघातानंतर स्थानिकांनी क्लीन-अप वाहनांची तोडफोड करत आंदोलन केले. हमीद (9) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून तो बैंगनवाडी परिसरात राहत होता. मंगळवारी सकाळी तो मदरशामध्ये गेला होता. तेथून घरी जात असताना अचानक त्याला पालिकेच्या क्लीन-अप वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत क्लीनअप वाहनाची तोडफोड करत आंदोलन केले.
गिरणी कामगारांच्या आंदोलनाचा लढा तीव्र करण्याचा शिवसेनेचा इशारा!
गिरणी कामगारांच्या घरांसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय म्हणजे कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप करताना घरांच्या प्रश्नावर यापुढे कामगारांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू स्मारकाला साक्ष ठेवून निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जयप्रकाश भिलारे, गोविंदराव मोहिते, नंदू पारकर, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, आण्णा शिर्सेकर, शिवाजी काळे, सुरेश मोरे, जयवंत गावडे, जितेंद्र राणे, नामदेव झेंडे, सखाराम भणगे, रवी कानडे आदी उपस्थित होते.
सध्या आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती
सध्याची निर्माण झालेली परिस्थिती ही आणीबाणीपेक्षाही महाभयंकर आहे. हलकट मनोवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना हाकलून लावा, असे परखड मत प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये मंगळवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक प्रा. श्याम मानव हे ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हान’ या विषयावर बोलत होते. राज्यातील सरकार संविधान गाडून अस्तित्वात आलेले असून, ते दिल्लीच्या मालकाला म्हणजेच भाजपाला धार्जिणा कारभार करतेय. लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून राज्य सरकार धडाधडा निर्णय घेत आहे, यामुळे राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. या पाताळयंत्र्यांना हटविणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, सुरेश झुरमुरे, दशरथ मडावी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विचार मांडले.
मुंबईत घराचं स्वप्न साकार
म्हाडातर्फे मुंबईतील 2 हजार 30 घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. आपल्या नावाची घोषणा होताच विजेत्यांना आनंदाश्रू अनावर झाले. मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी यंदा तब्बल 1,13,811 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर झाले होते. यावेळी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले.