
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट विश्वामध्ये स्टेनगन या नावाने चिरपरिचीत असणारा डेल स्टेन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून 38 वर्षीय स्टेन याने निवृत्तीची घोषणा केली.
‘आज मी अधिकृतित्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. सांगण्यासाठी खूप गोड-कडू आठवणी आहेत. कुटुंबापासून संघातील सहकाऱ्यांचे आणि पत्रकारांपासून पाठिराख्यांपर्यंत सर्वांचे धन्यवाद’, अशी पोस्ट डेल स्टेन याने सोशल मीडियावर केली. तसेच सराव, सामने, प्रवास, विजय, पराजय, आनंद आणि बंधुभाव यात 20 वर्ष लोटली. मला अनेकांचे आभार व्यक्त करायचे आहेत, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
Announcement. pic.twitter.com/ZvOoeFkp8w
— Dale Steyn (@DaleSteyn62) August 31, 2021
स्टेन याने 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 93 कसोटी सामने, 125 एक दिवसीय सामने आणि 47 टी-20 सामने खेळले. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 439, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 196 आणि टी-20 मध्ये 64 विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळी पूर्ण करण्यास तो अवघ्या एका विकेट्सने मागे राहिला.
आयपीएलमधून माघार
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला डेल स्टेन याने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली होती. मात्र मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो खेळला होता. यावेळी त्याने केलेल्या एका विधानामुळे हिंदुस्थानमधील त्याचे चाहते दुखावले गेले होते.




























































