दापोलीत तरुणीची छेड काढणाऱ्या दोघांचे ग्रामस्थांनी केले मुंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्या तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांची चांगलाच प्रसाद दिला. दोघांचेही मुंडन करून त्यांची भररस्त्यात धिंड काढली.

सविस्तर वृत्त असे की, साकुर्डेमार्गे विरार-मुंबई अशा जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधून एक तरुणी एकटीच प्रवास करत होती. या गाडीत उपस्थित असलेल्या संशयित चालकाने आणि अन्य एकाने त्या मुलीची छेड काढली. तरुणीने लगेचच याची माहिती गावात कळवली. गावातील लोकांनी तरुणी बसलेल्या ट्रॅव्हल्सच्या गाडीचा मागून पाठलाग केला आणि गाडी थांबवली. मुलीने दोघांनी छेड काढली असल्याचे सांगताच वेळवी कादिवली परिसरातील ग्रामस्थांनी चालक आणि अन्य एका संशयिताला ताब्यात घेऊन त्यांना चांगलीच अद्दल घडवावी, या उद्देशाने त्यांचे मुंडन केले.

संशयित आरोपी रायगड जिल्ह्यातील महाड दासगाव येथील राहणारा आहे. या प्रकरणाची दापोली पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यावेळी एका बसमालकाच्या संशयित मुलाचेही मुंडन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.