श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती उत्साहात साजरी, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत आज दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविकांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पहाटेपासून कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता पंचक्रोशीतील भक्तही या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते.

या उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता काकड आरती आणि प्रात:कालीन पूजा सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी भक्त-भाविकांचे पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या मुख्य चरणकमलांची महापूजा यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पवमान पंचसूक्त पठाण, रात्री उशिरा धूप-दीप आरती, पालखी सोहळा असे नित्य कार्यक्रम पार पडले. यावेळी दुपारी चार वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वस्त्रालंकारांनी सजवून जन्मकाळ सोहळ्यासाठी मुख्य मंदिरात आणण्यात आली. सायंकाळी 5 वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी महाराजांच्या चरणी फुले, गुलाल आणि अबीर यांची उधळण करून दत्त नामाचा एकच जयघोष केला. यावेळी पुजारी मंडळींनी पारंपरिक आरती, पाळणा म्हटला.

श्रींचा पाळणा दत्त जयंती उत्सवाचे मानकरी अवधूत नारायण पुजारी, घाटेवाडा यांच्या घरी ठेवण्यात आला होता. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्त देव संस्थानामार्फत दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ 25 हजारांहून जास्त भाविकांनी घेतला. भाविक-भक्तांच्या सुरक्षेकरिता पाच वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर क्लोज सर्किट टीव्ही सीसीटीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस आणि गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त होता. आज पहाटेपासून दिवसभरात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी श्री दत्त दर्शन घेतले. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला आणि शेजारतीने कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने पार पडण्यासाठी दत्त देवस्थान अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी, सेक्रेटरी संजय नारायण पुजारी, देवस्थानचे सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य , दत्त देवस्थान कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.