नौकेवरील बेपत्ता खलाशाचा मृतदेह पडवणे समुद्रकिनारी सापडला

फोटो प्रातिनिधीक

देवगड बंदरातील तुकाराम प्रभाकर बांदकर यांच्या मालकीच्या चांदणी नौकेवरून बेपत्ता झालेले खलाशी मुजाप्पा रामाप्पा पुजार(32, रा.यलबुर्गा, कर्नाटक) यांचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पडवणे समुद्रकिनारी आढळला.

मुजाप्पा पुजार देवगड बंदरातील चांदणी नौकेवर तांडेल म्हणून कार्यरत होते.बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ते नौकेवर होते.दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता नौकेवर इतर कर्मचाऱ्यांना ते दिसले नाहीत. त्यांनी याबाबत नौकामालकांना कळविल्यानंतर त्यांची शोधाशोध केली. मात्र, शोध न लागल्याने नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली होती. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पडवणे समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळला. देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवला. याबाबत तपास देवगड पोलिस करीत आहेत.