कुडाळ तालुक्यातील हिर्लोकमध्ये विजेच्या धक्क्याने गवारेड्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे एक गवा रेडा मृतावस्थेत आढळून आला. या गवारेड्याचा विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज कुडाळ वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हिर्लोक येथे मंगळवारी ग्रामस्थ प्रकाश बरगडे यांना वन्यप्राणी (नर) गवा हा तेथील शंकर अनंत शिर्के यांच्या मालकी क्षेत्रात मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी त्याबाबत वनविभागाला कळल्यानंतर वनविभागाचे अधिकारी अमृत शिंदे, कडावल वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके, वनपाल महेश पाटील, गोठोस वनपाल सुरेश मेतर, कडावल वनपाल प्रशांत कांबळे, कुसगाव वनरक्षक व गोठोस वनरक्षक महेंद्र देशमुख यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत या परिसराची पहाणी केली.त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ यांच्याकडुन मृत गव्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

प्रथमदर्शनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीवरुन हा रानगवा हा सुमारे 12 वर्षांचा असून तो इलेक्ट्रीक शॉक ( वीजेचा धक्का) लागून मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच जेथे हा मृत गवा आढळून आला तेथे वरील बाजुने वीजवाहिनी गेल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे या विद्युत भारीत तारेमुळे गव्याचा मृत्यू झाला असेल तर निष्काळजीपणा करणार्‍या संबधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कडावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके यांनी सांगितले.

या प्रकरणी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे, अशी माहिती कुडाळ वनरक्षक अमृत शिंदे यांनी दिली आहे. वन्यप्राणी रान गवा हा अनुसुची 1 मध्ये समाविष्ट असुन वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कायद्याने त्याला संरक्षण दिलेले आहे. अशा प्रकारे कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा मृत अवस्थेत आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळविण्यात यावे, असे आवाहन कुडाळ व कडावल वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.