
मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही दोन्ही शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. 1 जून 1930 रोजी सुरू झालेल्या या एक्सप्रेसला 92 वर्षे पूर्ण झाली असून 22 जूनपासून दख्खनची राणी नव्या अवतारात दिसणार आहे. या संपूर्ण गाडीचा मेकओव्हर करण्यात आला असून अधिक प्रवाशांना सामावून घेणारी, वातानुकुलित, आरामदायी प्रवासाचे सुख देणारी ही ट्रेन प्रवाशांसाठी सज्ज झाली आहे. देशातील ही एकमेव गाडी आहे ज्याला डायनिंग कारची म्हणजेच हॉटेलमध्ये बसून खाण्याची जशी व्यवस्था असते तशी व्यवस्था आहे. नव्या रुपातील या गाडीची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पाहणी केली.

डेक्कन क्वीनने प्रवास करणारी मंडळी डायनिंग कारमध्ये मिळणाऱ्या गरमागरम कटलेट, ऑम्लेटपाव आणि चहाची वारंवार आठवण काढतात. नव्या रुपातल्या या डेक्कन क्वीनमध्ये हे पदार्थ मिळणार की नाही ? याची अनेकांना उत्सुकता होती. यासंदर्भात आम्ही गाडीमध्ये खानपानाची सेवा पुरवणाऱ्या ए.एस.सेल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक सुरिंदर त्रिपाठी आणि अनीश भदौरिया यांची भेट घेतली. डेक्कन क्वीनमध्ये पूर्वी जे पदार्थ मिळायचे ते यापुढेही मिळणारच असे या दोघांनी सांगितले. शाकाहारी कटलेट, चिकन कटलेट,ऑम्लेट पाव , फ्रेंच फ्राईज, बेकन, साबुदाणा वडा, चीझ टोस्ट, चहा कॉफी हे पदार्थ तुम्ही पॅन्ट्री कारमध्ये बसून खाऊ शकता असे त्रिपाठी यांनी सांगितले. पदार्थाच्या चवीमध्ये तसूभरही फरक पडणार नाही उलट आम्ही प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहू असे अनीश यांनी सांगितले.

पावसाळा सुरू होत असून गाडीच्या डायनिंगकारमध्ये बसून बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटत गरमगरम कटलेट आणि चहाचा आनंद लुटण्याचे प्लॅन आतापासूनच अनेकांनी बनविले आहेत. नव्या डायनिंग कारचे प्रवाशांना आकर्षण असून ती पाहण्यासाठी आणि त्यात बसून खाण्याची अनेकांना उत्सुकता आहे. डायनिंग कारमध्ये आसन क्षमता ही 40 प्रवाशांची असून सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार रविवारी इथे गर्दी होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी सगळ्या प्रवाशांची भूक भागवून इथे त्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी करणार असा प्रश्न विचारला असता भदौरिया यांनी सांगितले की आम्ही वेगवान सर्व्हीस देत असल्याने टेबलवर बसलेल्या प्रवाशांना फार काळ वाट पाहावी लागत नाही. काही प्रवासी उभं राहून खाणंही पसंत करतात. त्यामुळे डायनिंग कारमधली गर्दी लवकर रिकामी होत असते. गाडीला असलेल्या व्हिस्टाडोममधील किंवा एसी चेअरकारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीटवरही खाणं मागवता येऊ शकतं. यामुळे डायनिंग कारमध्ये गर्दी झाली तरी ती लवकर ओसरते असं अनीश भदौरिया यांचं म्हणणं आहे.
नव्या डेक्कन क्वीनची वैशिष्ट्ये
या डेक्कन क्वीनचे पारंपरिक डबे जाऊन तिला एलएचबीचे वातानुकूलित डबे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तिच्या डायनिंग कारलाही एलएचबी तंत्रज्ञानाच्या स्वरूपात रूपांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा आनंद अधिक मोकळय़ा आणि अत्याधुनिक अशा डायनिंग कारमधून घेता येणार आहे.
एकावेळी 40 प्रवाशांच्या न्याहारीची व्यवस्था
नव्या डायनिंग कारच्या उपाहारगृहात एका वेळी 40 प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. दोन्ही टेबलच्या रांगेमध्ये मोठी जागा असणार आहे. तसेच ऑटोमेटीक वेस्टीबुल गेटही मोठे असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारमध्ये गॅसऐवजी इलेक्ट्रिक शेगडीवर अन्न शिजवले जाणार आहे. त्यामुळे फायर अलार्म व अग्निशमन उपकरणे असणार आहेत. प्रवाशांना अन्नपदार्थ सर्व्ह करण्यासाठी सर्व्हिस काऊंटर आकर्षक आणि रुंद असणार आहे. त्याच्या बाजूला मायक्रोओव्हन तसेच मोठा फ्रिजर असणार आहे.
अहमदाबादच्या संस्थेने केले डिझाईन
पूर्वीचे आयसीएफचे पारंपरिक डब्यांना निळा आणि पांढरा रंग होता. आता नव्या एलएचबी डेक्कन क्वीनला डार्क शेवाळी हिरवा आणि पिवळा अशी रंगसंगती दिली आहे. नवी रंगसंगती आणि तिचे डिझाईन अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन (एनआयडी) या संस्थेने केले आहे. वॉटरप्रूफ आणि युव्ही प्रिटिंग तंत्राने स्टिकर चिकटविल्याप्रमाणे कोच डिझाईन केले आहेत. नव्या तंत्रज्ञानाचे डबे वजनाने हलके पण मजबूत असून 17 डब्यांऐवजी आता ही गाडी 16 डब्यांची असणार आहे.






























































