खोल समुद्रातील मासेमारी उद्यापासून बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय 1 जून ते 31जुलैपासून बंद राहणार आहे. पावसाळी हंगामामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार असल्यामुळे देवगड बंदरातील बहुतांश मासेमार आपली नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे आता पारंपरिक पद्धतीने खाडीमधील आणि समुद्रकिनारी भागामधील मासेमारी केली जाणार आहे.

मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने मासेमारीकरिता महत्त्वाचा हंगाम समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी आलेले असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दरदेखील चांगला मिळत असतो, मात्र शेवटच्या टप्प्यात मासळी मिळत असताना शासनाने 1 जूनपासून समुद्रातील मासेमारी बंदी कालावधी जाहीर केल्यामुळे मच्छीमारांचा व या व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यावसायिकही निराश झाले. यांत्रिकी नौकांची हंगामाची सुरुवात चांगली झाली. मात्र मधील काळ निराशाजनक गेला. शेवटच्या टप्प्यात चार दिवस चांगली मासळी मिळत होती. यामध्ये सरंगा, सुरमई, पापलेट, कोळंबीचा समावेश होता. यांत्रिकी नौकांसाठी शेवट चांगला होत असताना 1 जूनपासून मासेमारी व्यवसाय बंद होणार असल्याने निराशाजनक ठरला.

कांडाळी मासेमारी व्यवसायाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांगडा, सौदांळा आदी चांगली मासळी मिळत असल्याने हा हंगाम चांगला गेला, असे स्थानिक मासेमार तसेच देवगड मासेमार संस्थेचे चेअरमन द्विजकांत कोयंडे यांनी सांगितले. फायबर पातीद्वारे करण्यात येणारा न्हैय मासेमारी व्यवसाय सध्या कमी प्रमाणात होत आहे. नौकेवरील जाळी काढून ती धुणे आणि सुकवण्याची मोहिम सध्या वेगात सुरू आहे. जेसीबीद्वारे नौका किनाऱ्यावर काढणे सर्वच दृष्टिने फायदेशीर ठरत असल्याने जेसीबीचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. तरीही अडचणीच्या जागेत घेण्यात येणाऱ्या नौकांना मनुष्यबळाचाच आधार अजूनही घ्यावा लागत आहे. 31 जुलैपर्यंत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात होईल, मात्र बहुतांशी खलाशीवर्ग गणेशोत्सव झाल्यानंतरच नौकांवर रुजू होत असल्याने गणेशोत्सवानंतरच खऱ्या अर्थाने मच्छीमारी हंगामाला सुरुवात होईल.