
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियातील प्रचारसभेत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडवणारा कैदी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे असे मोदी म्हणाले. या गौप्यस्फोटानंतर राजकीय खळबळ उडालेली असतानाच आज विमान घोटाळाप्रकरणी तिहार जेलमध्ये असलेला दीपक तलवार हा आरोपी दिल्ली कोर्टात पोहचला आणि कोर्टाकडे दिलेला दया अर्ज त्याने मागे घेतला. त्यामुळे मोदी म्हणतात तो कैदी दीपक तलवारच काय, अशा राजकीय भुवया आता उंचावल्या आहेत.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तब्बल 600 कोटींची सौदेबाजी झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या घोटाळय़ाचा सूत्रधार दीपक तलवार याला सीबीआयने दुबईत पकडले आणि तिहारमध्ये डांबले. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा तलवारची कसून चौकशी करीत असून त्याने चक्क एअर इंडियाचे फायद्यातील विमान मार्ग खासगी विमान कंपन्यांना विकल्याचे उघड झाले आहे. ईडीने 30 जानेवारीपासून आपल्याला बेकायदेशीरपणे तिहारमध्ये डांबल्याची याचिका तलवारने दिल्लीच्या विशेष न्यायालयात केली होती, पण आज त्याने ती मागे घेतली.
तलवारने विमानाचे मार्गच विकले!
दीपक तलवार याला 30 जानेवारी 2019 रोजी दुबईत पकडले आणि त्याची रवानगी थेट तिहार जेलमध्ये करण्यात आली. तलवारला जेव्हा दिल्लीच्या विशेष न्यायालयात कोठडीसाठी हजर करण्यात आले तेव्हा ईडीने त्याच्या धक्कादायक घोटाळय़ाची कुंडलीच मांडली. तलवार याने चक्क एअर इंडियाचे फायद्यातील विमान मार्ग एअर अरबिया, एमिरेट्स आणि कतार एअरवेज या खासगी विमान कंपन्यांना विकल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या व्यवहारात तलवारच्या मालकीच्या पाच कंपन्यांना 212 कोटींपेक्षा अधिक मलिदा मिळाला.
70 हजार कोटींची विमान खरेदी
एअर इंडियाचे मार्ग विकण्यापुरताच तलवार आणि कंपनीचा घोटाळा सिमीत नसून ईडीने आणखी तीन प्रकरणांत त्याची चौकशी सुरू ठेवली आहे. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण, परदेशी गुंतवणूक घेऊन काही प्रशिक्षण संस्था निर्माण करणे, शिवाय बोइंग आणि एअर बस या कंपन्यांकडून 70 हजार कोटींची 111 विमाने खरेदी करणे या व्यवहारातही फार मोठा घोटाळा झाला असावा, असा ईडीला संशय आहे. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण झाले तेव्हा मंत्री पदावर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल होते.
एअर बसकडून एअर इंडियाने विमाने खरेदी केली आणि त्या बदल्यात तलवारच्या ऍडव्हांटेज इंडिया या स्वयंसेवी संस्थेला सीएसआर फंडातून 90 कोटी रुपये मिळाले. 23 एप्रिल 2008 ते 6 फेब्रुवारी 2009 या कालावधीत तलवारच्या कंपन्यांना 60.48 दशलक्ष डॉलर्स मिळाले.
तलवारची ‘फाइव्ह स्टार’ व्यवस्था प्रफुल्ल पटेल यांच्या ऑफिसकडून!
दीपक तलवार जेव्हा उदयपूर येथे आला होता तेव्हा त्या शहरातील ‘लेक पॅलेस’ या फाइव्ह स्टार हॉटेलमधील निवास व्यवस्था तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयातूनच करण्यात आली होती, असा दावा एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीने तलवार आणि पटेल यांच्या कार्यालयातील ई-मेल संभाषणाच्या आधारे केला आहे. ‘‘प्रफुल्ल पटेल यांची 29 तारखेला भेट हवी आहे, असा जैन यांचे सहाय्यक प्रभाकर यांचा कॉल आला होता. भेटीचे ठिकाण आणि वेळ कळवावी,’’ असा एक ई-मेल पटेल यांच्या कार्यालयातून तलवार याला गेला होता. तर दुसऱया एका मेलमध्ये कुरूप नावाचा कुणी तलवारला म्हणतो, ‘‘प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयातून नागपाल यांचा कॉल आला होता. तुमच्या निवासाची व्यवस्था उदयपूर येथील लेक पॅलेस हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले’’ असे सदर इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गौप्यस्फोटानंतर दीपक तलवार याच्या विमान घोटाळय़ाच्या चौकशीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय, नॅशनल एव्हिएशन कंपनी आणि एअर इंडिया यामधील कुणाचा या घोटाळय़ात सहभाग आहे याची चौकशी ईडी करत असून तलवार याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येतील, असा दावा विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.
मोदी म्हणतात तो राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी हाच काय? कोण आहे हा दीपक तलवार?
नवी दिल्लीत मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध प्रस्थापित करून खासगी कंपन्यांची कामे करून देणारे आणि त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे कमिशन घेणारे अनेक जण कार्यरत आहेत. राजधानीत त्यांना ‘लॉबिस्ट’ म्हणून ओळखले जाते. दीपक तलवार हा त्यापैकीच एक आहे. तलवारची इंटिग्रल नावाची जनसंपर्क कंपनी असून ‘ऍडव्हांटेज इंडिया’ नावाच्या एनजीओवरही त्याने मेहरबानी केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. तलवारने तब्बल 90 कोटी रुपये या एनजीओला देऊन ‘पांढरे’ केल्याचा त्याच्यावर एक आरोप आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांच्या घरी मध्यरात्री जाऊन त्याने भेटही घेतली होती. तशी सिन्हा यांच्या बंगल्यावरील लॉगबुकमध्ये नोंद आहे, असे सीबीआय म्हणते.

























































