‘ऍमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ची ‘ईडी’कडून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

परकीय चलन नियमन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सांगण्यात आले.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेद्र मेनम आणि न्यायमूर्ती ए. जे. भांबानी यांच्या खंडपीठापुढे ‘ईडी’च्या वकिलांनी याबाबत माहिती दिली. परकीय चलन नियमन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ऍमेझॉन आणि फ्लिकार्ट या दोन कंपन्यांवर गुन्हा नोंदविला असून त्यांनी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) नियमांचा भंग केल्याबाबत चौकशी होत आहे, असे ईडीचे वकील अमित महाजन यांनी सांगितले. यापूर्वी उच्च न्यायालयाने टेलिकॉम वॉचडॉग या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर केंद्र सरकार, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांना एफडीआय नियम उल्लंघनाबाबत माहिती देण्याचे आदेश दिले होते.

याचिकेतील मुद्दे

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्याद्वारे ई कॉमर्स बिझनेस सुरू केला आहे. अनेक महागडय़ा वस्तू स्वस्त दराने विकून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. विकल्या जाणाऱया गुडस् स्टॉकची मालकी सदर कंपन्यांकडे नसल्याने वस्तूंच्या किमतीवर परिणाम होत आहेत.

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या घाऊक प्रमाणात उत्पादकांकडून थेट वस्तू खरेदी करीत असल्यामुळे त्यांना किंमतीत अधिक डिस्काऊंट मिळते. त्यामुळे सदर कंपन्या वस्तू कमी किमतीत ग्राहकांना विकू शकतात.