काळ्या जादूची राजधानी! दिल्लीकर जाताहेत तंत्र-मंत्राच्या आहारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील बुरारी येथे एकाच कुटुंबातील ११ जणांचा रहस्यमयी मृत्यू झाल्याने सगळा देश हादरला आहे. या हत्यांमागचा खरा सूत्रधार शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. मिळालेल्या पुराव्यांवरुन या घटनेमागे तंत्र-मंत्र आाणि काळी जादू असे प्रकार असल्याचा दावा पोलीस करत असतानाच अख्खी दिल्लीच काळ्या जादूची राजधानी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील लोक लहान सहान गोष्टींसाठी तंत्र-मंत्र करणाऱ्या आणि अघोरी विद्येची साधना करणाऱ्या बाबांच्या चरणी लीन होताना दिसत आहेत, असा दावा एका इंग्रजी दैनिकाने केला आहे.

प्रामुख्याने दिल्ली एनसीआर या भागात गूढ साधना करणाऱ्या जादू टोणा करणाऱ्या बाबांचा धंदा जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारीपासून वैवाहिक जीवनातील भांडणं, अपत्यप्राप्ती, सवतीपासून सुटका, प्रेमात अपयश, वशीकरण यासाठी उच्चशिक्षित लोकही या बाबांचे उंबरडे झिजवत असल्यांचे या दैनिकाने म्हटले आहे. दिल्लीकरांचा अशा विद्येकडे वाढणारा ओढा बघून या बाबांनी प्रचारासाठी आपल्या वेबसाईटही तयार केल्या आहेत. गिऱ्हाईकांना अपेक्षित निर्णय मिळवून देण्यासाठी हे ढोंगी बाबा त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. यासाठी त्यांनी नेटबँकींग, ई-वॉलेट आणि घरात बसून ऑनलाईन पेमेंट करण्याच्या सोयीही उपलब्ध करुन दिल्या आहेत. विशेष म्हणजे यात आता आधुनिक अघोरींचीही भर पडली आहे. हे अघोरी इतर अघोरींसारखे न राहता सामान्य व्यक्तींप्रमाणे जीन्स टीशर्ट, पॅट शर्ट अशा मॉर्डन पेहरावात फिरतात. ज्यामुळे त्यांना ओळखणे कठीण असल्याच या दैनिकात सांगण्यात आले आहे.