
आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना पुढच्या वर्षी 3 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितले आहे. याआधी तपास यंत्रणेने केजरीवाल यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते, त्यांनी ईडीने त्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे.
दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. दोघेही सध्या तुरुंगात आहे. त्यांनतर ईडीने याच प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दोनदा समन्स बजावले. पहिले समन्स 2 नोव्हेंबर, तर दुसरे 21 डिसेंबरला बजावण्यात आले होते. मात्र दोनही वेळेस केजरीवाल हे चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता ईडीने त्यांनी तिसऱ्यांदा समन्स बचावत चौकशीसाठी बोलावले आहे.
केजरीवाल यांनी पहिल्यांदा समन्स बजावण्यात आले तेव्हा देशभरात राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आम आदमी पार्टीचे उमेदवारही निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या प्रचाराला जाणार असल्याचे कारण सांगत केजरीवाल यांनी चौकशीला उपस्थित राहता येणार नसल्याचे म्हटले होते. तर दुसऱ्यांदा समन्स बजावले तेव्हा त्यांनी विपश्यनेसाठी गेल्याचे सांगितले होते.
दरम्यान, केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेले समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतून प्रेरित असल्याचे म्हणत ते मागे घेण्याची मागणी केली होती.




























































