दिल्ली डायरी – हिमाचलमधील वाढीव मतदान कोणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी फारसा गाजावाजा न होता मतदान पार पडले. तब्बल 75 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाल्याने दिल्लीकर धास्तावले आहेत. सामान्यपणे मतदानाचा वाढलेला टक्का विद्यमान सत्तेचे सिंहासन डळमळीत करतो, असा अनुभव आहे. हिमाचलमध्ये हा वाढीव टक्का कोणाला मिळाला हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल. मात्र नितांतसुंदर अशा देवभूमी हिमाचलमध्ये `परिवर्तनाचे वारे’ यदाकदाचित सुटलेच तर त्याचा धक्का दिल्लीच्या तख्ताला बसल्याशिवाय राहणार नाही.

हिमाचल हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे गृहराज्य.   म्हणूनच भाजपसाठी हे राज्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण जोर लावला होता. तथापि गेली पाच वर्षे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी केलेला बेबंद कारभार, नड्डा विरुद्ध अनुराग ठाकूर हा पक्षांतर्गत वाद, मोठ्या प्रमाणावर झालेल्या बंडखोरीचा फटका या निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अरविंद केजरीवालांनी नेहमीप्रमाणे गाजावाजा केला. मात्र हिमाचलमध्ये `आप’ तिसर्‍या स्थानावर जाईल, असा अंदाज आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस चमत्कार करेल, असे बोलले जात आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूकीसाठी गेल्या आठवड्यात मतदान पार पडले. यावेळी मतदान 75 टक्क्यांपेक्षाही जास्त झाले. सर्वसाधारण सरासरीच्या तुलनेत हा टक्का वाढीव आहे. त्यामुळे साहजिकच हा वाढीव टक्का कोणाला मिळाला असेल, यावर राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. त्यात या निवडणुकीत बंडखोरीने भाजपची दाणादाण उडवली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतदान होईपर्यंत काँग्रेसच्या बाजूने झुकलेली दिसली. वास्तविक, जयराम ठाकूर या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करून मोदी-शाह जोडीने एकाच वेळी नड्डा आणि प्रेमकुमार धुमल या दोन्ही गटांना काटशह दिला होता. मात्र ठाकूर हे गेल्या पाच वर्षांत सपशेल अपयशी ठरले. वीरभद्रिंसग या दिग्गज नेत्याच्या निधनामुळे हिमाचलमधली काँग्रेस दिशाहीन झाली होती. तथापि यंदाच्या निवडणुकीत कधी नव्हे तो काँग्रेस पक्ष एकवटला. राहुल तिकडे ‘भारत जोडो’मध्ये व्यस्त असताना हिमाचलची जबाबदारी प्रियंका गांधी यांनी एकहाती सांभाळली. मुकेश अग्निहोत्री आणि राजीव शुक्ला या दुकलीने प्रियंका यांना चांगलीच साथ दिली. आम आदमी पक्षाने नेहमीप्रमाणे हवाई पतंग उडवले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही जवळपास 75 टक्के इतकेच मतदान झाले होते. यंदा अर्धाएक टक्क्याने मतदानाचा टक्का वधारला आहे. भ्रष्टाचार हा हिमाचलच्या निवडणुकीत गाजलेला मुद्दा ठरला. काँग्रेसने ही निवडणूक जिंकली तर जे.पी. नड्डा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहतील. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आला आणि नड्डा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर भाजपमधील अंतर्गत राजकारणही ढवळून निघणार आहे. हिमाचलात बदलाच्या वार्‍यांचा अंदाज वर्तविला जात आहे. हे वारे आणखी कोणती `दिशा’ बदलतात ते भविष्यात दिसेलच.

दीदींनी खिलवले ‘पकोडे’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अत्यंत धडाकेबाज अशा रणरागिणी आहेत. दिल्लीकरांच्या निरंकुश सत्तेला दीदी पुरून उरल्या आहेत. त्यामुळे दिल्लीकरांचेही दीदींबद्दलचे `प्रेम’ सर्वश्रुत आहे. मात्र सध्या दीदी चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या एका कृतीने. त्याचे झाले असे की, बेलपहाडी या आदिवासीबहुल भागात एका सभेला संबोधित करताना ममतादीदींनी केंद्र सरकार हे राज्याच्या वाट्याचा निधी देत नसल्याबद्दल प्रखर टीका केली. ही टीका वगैरे करून दीदी झाडाग्रामकडे परतत असताना त्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले. मुख्यमंत्री झाल्या तरी ममतादीदींनी आपला साधेपणा कायमच जपला आहे. रस्त्याच्या कडेला एका पकोड्याचे दुकान पाहून दीदींनी आपला ताफा थांबवायला सांगितला. स्वत: तर पकोड्यावर ताव मारलाच, शिवाय इतरही लोकांना प्रेमाने पकोडे खाऊ घातले. राज्याच्या मुख्यमंत्रीच आपल्यासारख्या गरीबाच्या स्टॉलवर आल्या हे पाहूनच बुद्धदेव मोहंती हा स्टॉलधारक हरखून गेला. शिवाय ममतादीदींसारख्या व्हीआयपी गिर्‍हाईकाचे पाय लागल्यामुळे त्याची हातोहात हजारो रुपयांची विक्रीही झाली. बाकी पकोड्यांवरून या देशात झालेली बेरोजगार युवकांची हेटाळणी काही नवीन नाही. वर्षाला दोन कोटी रोजगारांच्या आश्वासनाबाबत विचारल्यावर मायबाप केंद्रीय सरकारने ‘`नोकरी नही है तो पकोडे तलो’’, असे उत्तर दिले होते. दीदींनी खिलवलेल्या पकोड्यांमुळे भाजपच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या पकोड्यांची आठवण ताजी झाली.

मैनपुरीत काय होईल?

आम्ही कौटुंबिक संबंध जपतो. पोटनिवडणुकीत राजकारण करत नाहीत, उच्च लोकशाही परंपरा पाळतो, अशी जपमाळ भाजप दिवसरात्र ओढत असतो. मात्र त्या पक्षाच्या `कथनी आणि करनी’मध्ये अनेकदा अंतर असते हे आजवर दिसून आले आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील पोटनिवडणुकीतही भाजपच्या या प्रवृत्तीचा अनुभव येत आहे. दिवंगत मुलायमसिंग यादव यांच्याबाबत पंतप्रधान मोदी `मुलायमिंसगजी का मैं बडा सम्मान करता हूं’, असे कितीही म्हणत असले तरी मुलायम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने मुलायम स्नुषा डिंपल यांच्याविरोधात रघुराज शाक्य यांना उमेदवारी देऊन आपला कोतेपणा पुन्हा सिद्ध केला आहे. मैनपुरी हा मुलायम यांचा बालेकिल्ला आहे. नेताजी हयात नसल्यामुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती डिंपल यांना सहज तारून नेईल. मात्र तरीही काही प्रश्न उरतातच. मुळातच मुलायम यांच्या निधनानंतर समाजवादी पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन अखिलेश यादव यांना ‘आपला पक्ष घराणेशाही चालवत नाही,’ असा संदेश देता आला असता. मात्र त्यांनी दुर्दैवाने ही संधी गमावली. हीच संधी साधत भाजपने एकेकाळी अखिलेश यांचा ज्यांच्याशी छत्तीसचा आकडा आहे ते त्यांचे काका शिवपाल यादव यांचे एकेकाळचे खासमखास रघुराज शाक्य या माजी खासदाराला रिंगणात उतरवले आहे. शाक्य हे भाजपमध्ये येण्यापूर्वी शिवपाल यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टीत होते. त्यामुळेच भाजप यादव घराण्यातील बेदिलीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. आझमगढच्या यापूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीतही अखिलेश यांनी चुलतबंधू धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी देवून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. त्याच्या जखमा ताज्या असताना आणि आझमगढसारखा बालेकिल्ला ढासळला असताना अखिलेश यांनी त्यापासून बोध घ्यायला हवा होता. मैनपुरीमध्ये तिकीट मिळविण्यासाठी यादव कुटुंबीयांत झालेली रस्सीखेच नक्कीच शोभादायक नव्हती. आता मुलामय यांची `पुण्याई’ त्यांच्या पश्चात पणाला लागली आहे हे नक्की.