दिल्ली डायरी – सिद्धूंची ‘बल्ले बल्ले’, पण सावधान…!

>> नीलेश कुलकर्णी n [email protected]

पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनून नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षांतर्गत स्पर्धेत कॅप्टन अमरिंदर यांच्यावर मात करून ‘बल्ले बल्ले’ केले आहे. अर्थात अमरिंदर विरुद्ध सिद्धू या वादात पंजाबचे नुकसान होता कामा नये. खलिस्तानी कारवायांचे सावट पंजाबवर घोंघावत असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या राष्ट्रनिष्ठ नेत्याचे हात मजबूत करायला हवे होते, मात्र तसे घडलेले नाही. निवडणुका येतात-जातात. पंजाब ही दहशतवादाची ‘नवी प्रयोगशाळा’ होणार असेल तर अशा ‘उडता पंजाब’ पासून ‘सावधान’ होऊन जालीम उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्र सरकार ते करेल अशी अपेक्षा करूया. काँग्रेस श्रेष्ठाRनीही काँग्रेसमधील वाद एकदाचा संपवावा इतकेच.

पंजाब निवडणुकीच्या काळात खलिस्तानी चळवळ पुन्हा जोमाने फोफावू शकते, अशी ‘ऍडव्हायजरी’ मिळाल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाचे धाबे दणाणले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लड व कॅलिफोर्निया संबंधित काही वेबसाईट्सचे क्लिप ट्रक केल्यानंतर गुप्तचर यंत्रणांना खळबळजनक माहिती हाती लागली आहे. त्यानंतर आता वेगाने सूत्रे हलत आहेत. देशाच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा खलिस्तानींशी संबंध जोडून देशातील सत्ताधाऱयांनी अगोदरच प्रश्न गंभीर केलेला आहे. त्यात या नवीन घडामोडींमुळे पंजाबच्या निवडणुकीचा पेपर देशासाठी अवघड जाणार आहे. पंजाबात मिळविण्यासारखे आणि गमावण्यासारखे भाजपकडे काहीही नाही. अकाली दलासोबतची सर्वात जुनी युती तोडल्यानंतर भाजपला या निवडणुकीत 10-20 जागांची आशा आहे. त्यामुळे भाजप राजकीयदृष्टय़ा या निवडणुकीत फारसा जोर लावणार नाही. त्यामुळे पंजाबात प्रमुख मुकाबला काँग्रेस विरुद्ध आप व अकाली दल या पक्षांत होणार आहे.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखे खमके नेतृत्व असणे सध्याच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे, मात्र नवज्योतसिंग सिद्धू आणि कंपनीने त्यांना मेटाकुटीस आणले आहे. काँग्रेस श्रेष्ठाRनी पंजाबातील तिढा सिद्धूंची नेमणूक करून सोडवला असला तरी धोतराच्या सोग्यात पाय अडकल्यासारखी स्थिती काँग्रेसच्या या नव्या निर्णयाने झाली आहे. पुन्हा सिद्धूंनी जाहीर माफी मागितल्याशिवाय आपण त्यांना माफ करणार नाही, अशी ताठर भूमिका अमरिंदर सिंग यांनी घेतली होती. मात्र सिद्धू यांनी माफी न मागताही कॅप्टन अमरिंदर यांना सिद्धूंच्या पदग्रहणावेळी नाइलाजाने उपस्थित राहावे लागले. यावेळी सिद्धू यांनी अमरिंदर यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचे चरणस्पर्श करून भावी संघर्षांची बीजे रोवली आहेत.

अकाली दलाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची असली तरी त्या पक्षाची पीछेहाट होताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांचा आप या निवडणुकीत मुसंडी मारेल अशी भाकिते वर्तवली जात आहेत. एकंदरीत पंजाबमधील राजकीय अस्थिरता व बेदिलीचा फायदा खलिस्तानींनी उठवू नये यासाठी केंद्र सरकार व काँग्रेस पक्षाने मिळून काम करायला हवे. ‘उडता पंजाब’कडे देशाच्या दुश्मनाची वक्रदृष्टी आहे. देश आणि देशहित कोणत्याही राजकीय उद्दिष्टापेक्षा महत्त्वाचे असते. पंजाबच्या निमित्ताने ते सर्वांनी सिद्ध करून दाखवायला हवे!

दिल, दोस्ती आणि दुनियादारी

हल्लीच्या राजकारणात व्यक्तिगत पातळीवर द्वेषाचे व मत्सराचे वातावरण असताना दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र विमान प्रवास करत शेअर केलेला अनुभव अफलातून असाच आहे. त्याचे झाले असे की, माजी केंद्रीय मंत्री व द्रमुकचे खासदार दयानिधी मारन एस्टीमेट कमिटीच्या संसदीय बैठकीसाठी दिल्लीत आले होते. त्याच दिवशी ते दिल्लीहून चेन्नईच्या फ्लाइटमध्ये बसले. ते विमानात बसत असताना विमानाच्या पायलटने ‘मिस्टर मारन, आर यू ट्रव्हलिंग विथ धिस फ्लाइट?’ अशी पृच्छा केली. त्यावर मारन यांनी ‘येस’ असे उत्तर दिले. कोरोनाच्या नियमावलीमुळे पायलटने मास्क घातलेला असल्याने मारन यांना अशी आस्थेवाईक चौकशी कोणी केली याचा काही उलगडा झाला नाही. तो उलगडा झाला तो पायलटच्या नावाची घोषणा झाल्यानंतर. ते नाव होते ‘पायलट राजीव प्रताप रुडी…’ मग पायलटने केलेल्या आस्थेवाईक चौकशीमागचे इंगित मारन यांना कळले. गमतीचा भाग म्हणजे संसदेच्या एस्टिमेट कमिटीच्या मीटिंगला हे दोन्ही खासदार सदस्य या नात्याने दोन तासांपूर्वी एकत्र उपस्थित होते. त्यानंतर चेन्नईत लॅण्डिंग झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मस्तपैकी कॉफी घेतली. ‘माझ्या आयुष्यातला मित्रासोबतचा सुंदर प्रवास’, असे वर्णन मारन यांनी केले तर रुडी यांनीही त्याला दाद दिली. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना मारन यांचे वडील मुरोसिली मारन यांचे राजीव प्रताप रुडी हे ज्युनियर म्हणजेच राज्यमंत्री होते याचीही एक आठवण मारन यांनी यावेळी ट्विटरद्वारे करून दिली. यासंदर्भातला व्हिडीओही शेअर केला. हल्लीचे राजकारण व्यक्तिद्वेषाने भारलेले आहे. त्यातली दिलदारी संपत चालली आहे. त्यामुळेच द्रमुक व भाजप या दक्षिण-उत्तर वैचारिक टोक असलेल्या दोन राजकीय नेत्यांमधली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही सुखावणारी अशीच आहे.

बाबुल प्यारे!

केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालमधले भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी तत्काळ ट्विटरवर भाजपमधून कोलांटउडी मारून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या मुकुल राय यांना ‘फॉलो’ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अगोदरच बंगालमधील पराभवाने सैरभैर झालेल्या भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेत डझनभर मंत्र्यांना नारळ देण्यात आला. त्यात हे एक सुप्रियो होते. अर्थात मंत्री वगैरे म्हणून काही चमकदार कामगिरी केल्याची नोंद त्यांच्या खाती नव्हती. त्यात विधानसभेच्या टॉलीजंग मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुप्रियो यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्यासारख्या वजनदार नेत्यांनीही ‘आपल्याला का वगळले?’ याबद्दल ‘ब्र’ काढला नाही. मात्र सुप्रियो यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने मुकुल राय यांना ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केल्याने मुकुलबाबू सुप्रियो यांना तृणमूलमध्ये घेऊन जातील, अशीही चर्चा रंगली आहे, मात्र या सगळ्याचे बाबुल यांनी खंडन केले आहे. अशा राजकारणाची मला आता शिसारी आली आहे. राजकीय संन्यास घेण्याचा माझा विचार असल्याचे सुप्रियो यांनी एका मुलाखतीत सांगितले. वास्तविक बाबुल सुप्रियो हे पट्टीचे गायक, मात्र अशा गायक, नट-नटय़ांवर भाजपची नजर असते. भाजपने त्यांना राजकारणात आणले. सुरुवातीला केंद्रात अवजड उद्योग खात्याचे राज्यमंत्री बनवले. या खात्यात काहीच काम नसल्याने बाबुल मंत्रालयातच आपला ‘रियाज’ करायचे अशी वदंता होती. गायक ते केंद्रीय मंत्री अशा प्रवासाला आता ‘ब्रेक’ लागला आहे. ‘जाने कहां गये वो दिन?’ असे गीत आता बाबुल सुप्रियो यांना गावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या