लेख : दिल्ली डायरी : दिल्लीमधील हम ‘आप’ के है कौन?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

बीजेपी को हराने के लिए दोस्ती का हाथ बढाते है, हा ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रस्ताव काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी धुडकावून लावला. काँग्रेसने या पद्धतीने ‘हम आप के है कौन’ असा सवाल केला आणि महागठबंधन नावाचे बंगळुरूत आकाराला आलेले शिंकाळे दिल्लीत निवडणुकीपूर्वीच तुटले. राजधानीतून भाजपचा सफाया करण्यासाठी काँग्रेस-आपमध्ये आघाडी व्हावी यासाठी बराच काळ चर्वितचर्वण सुरू होते. त्याचा शेवट आता झाला आहे.

सात-आठ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या भ्रष्ट व निक्रिय कारभाराविरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या ‘अण्णा मंडळा’च्या पाळण्यातून अरविंद केजरीवाल व त्यांच्या ‘आप’चा जन्म झाला होता. त्यानंतर केजरीवालांनी इतक्यांदा दिल्लीकरांना टोप्या घातल्या की त्याची मोजदाद नाही. ज्या काँग्रेसविरोधात घसा साफ करत केजरीवालांचा दिवस उगवत नसे त्याच काँग्रेसशी हात मिळविण्याचा प्रस्ताव केजरीवाल यांना दिला होता. केंद्रातील मोदी सरकारने नायब राज्यपालांच्या माध्यमातून केजरीवाल यांना नीट कारभार करू दिला नाही, मात्र तरीही आरोग्य शिक्षण, पाणी व विजेच्या क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली हे नाकारता येणार नाही. मात्र तरीही ज्या काँग्रेसला भ्रष्टाचाराची जननी असे स्वतः केजरीवाल म्हणाले त्याच पक्षाच्या मांडीवर जाऊन बसण्याची त्यांना घाई का झाली, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

मुख्यमंत्रीपदी आल्यावर अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांना कॉमन वेल्थ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात डांबण्याची घोषणा केली होती. मात्र केजरीवालांचे गेल्या पाच-सहा वर्षांतच इतके राजकीय हसे झाले आहे की ज्या शीला दीक्षितांविरोधात त्यांनी रान उठविले त्यांच्याचकडे आघाडीसाठी त्यांना याचना करावी लागली. एवढे जबरदस्त राजकीय शीर्षासन करूनही काँग्रेसने त्यांना ‘हम आप के है कौन’ असा सवाल केला आणि महागठबंधनचे दरवाजे बंद केले. केजरीवालांसारखा उपद्व्यापी गृहस्थ जवळ करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे एवढा सुज्ञपणा शीला दीक्षितांसारख्या जुन्याजाणत्या नेत्यांमुळे थोडय़ाफार प्रमाणात काँग्रेसमध्ये शिल्लक आहे. आघाडी केल्यास काँग्रेसच्या केडरच्या जोरावर केजरीवाल पंजाब, हरयाणा, गोवा व छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला वरताण होतील. काँग्रेसच्या राजकारणाचा संकोच होईल ही शक्यता लक्षात घेऊनच काँग्रेसने केजरीवालांना पिटाळून लावले आहे. त्याचबरोबर आपल्या विरोधात रात्रंदिवस बोंबाबोंब केलेल्या नेत्यालाच सोबत घेतले तर त्याचा विपरीत संदेशही जनमानसांत गेला असता. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन राहुल गांधींनी अजय माकन यांचा केजरीवालांसोबतचा दोस्तीचा हट्ट मोडून काढत शीला दीक्षितांचा सल्ला मान्य केला आणि ‘आप’बरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. शिंक्याचे तुटले की बोक्याचे फावते या उक्तीप्रमाणे काँग्रेस व आपमध्ये आघाडी होणार नसल्यामुळे एरवी धास्तावलेल्या दिल्लीतील भाजपवाल्यांमध्ये मात्र ‘हाऊ इज द जोश’ अशी लहर आली आहे.

बेताल नेते

पुलवामामधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी केलेले वर्तन व टिप्पणी लाज आणणारी आहे. पुलवामातील हल्ल्याबाबत शंका उपस्थित करून आणि सर्जिकल स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मेले ते सांगा असा घोषा लावून काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या संतापात भर घातली आहे तर प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करण्याची गेल्या पाच वर्षांत सवय लागलेल्या भाजपने सर्जिकल स्ट्राइकचेही ‘पॉलिटिकल मार्केटिंग’ केले आहे. मेघालयचे राज्यपाल तथागत राय यांनी पुलवामा हल्ल्यानंतर कश्मिरी जनतेवरच बहिष्कार घालण्याची भाषा केली. राजस्थानातील चुरू येथील पंतप्रधानांच्या जाहीर सभेत पुलवामातील शहीदांचे फोटो लावण्यात आले. गुजरातमधील भाजपचे प्रवक्ते भरत पंडय़ा यांनी कहर करत पुलवामातील शहीदांमुळे भाजपची हवा असल्याचे सांगितले. कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी सर्जिकल स्ट्राइकमुळे कर्नाटकात तब्बल 22 जागा आम्ही जिंकू असे संवेदनाशून्य विधान केले. लष्करप्रमुख राहिलेले देशाचे विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी तर सर्जिकल स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मेले हे विचारणाऱ्याला हेलिकॉप्टरला बांधून सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली. अर्थात, वादग्रस्त वक्तव्यात काँग्रेसचेही बोलभांड तेवढेच पुढे आहेत. ‘ओसामाजी’ व ‘मिस्टर हाफीज सईद’ म्हणणाऱ्या दिग्विजय सिंग यांनी यावेळीही अकलेचे तारे तोडलेच! कर्नाटकच्या बी. के. हरिप्रसाद यांनी पुलवामा व सर्जिकल स्ट्राईक हे नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा पोरकट दावा केला. या सर्वांवर कडी म्हणजे तुम्ही चुकूनमाकून उत्तर प्रदेशात गेलाच तर तिथे जागोजाग पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या हे लढाऊ विमानांच्या साक्षीने पोस्टरवर दिसतील. जणू केशवप्रसाद मौर्यांनी स्वतःच हवाई हल्ला करून पाकिस्तानचा  बंदोबस्त केला आहे.

jay-pandaजय पांडा आणि तथागत सत्पथी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी वाराणसीबरोबरच ओडिशातील जगन्नाथाच्या पवित्र पुरीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. थोडक्यात ओडिशाच्या किनाऱ्यावर कमळ फुलविण्याची भाजपला घाई झाली आहे. ओडिशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल खिळखिळा करून कमळ फुलवता येते का यावर सध्या भाजपचे चाणक्य काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्योगपती असलेले बिजू जनता दलाचे एक विद्वान खासदार जय पांडा यांना भाजपात प्रवेश देऊन पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. धर्मेंद्र प्रधानांकडून ओडिशा पादाक्रांत होण्याची शक्यता नसल्याने ही बाहेरची कुमक मागवली जात आहे.

saptashri10नवीन बाबूंशी खटके उडाल्यापासून जय पांडा तसे पक्षापासून अलिप्तच होते. त्यांनी वेगळी वाट धरली असतानाच बिजू जनता दलाचे दुसरे  विद्वान खासदार तथागत सत्पथी यांनी राजकारणातून निवृत्ती घेत पुन्हा सक्रिय पत्रकारितेत येण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. बिजू जनता दलाचे सर्वच खासदार विद्वान आहेत. त्यात लोकसभेतील गटनेते भर्तृहरी मेहताब व सत्पथी हे दोघेही माजी मुख्यमंत्र्याचे चिरंजीव. ही साम्यस्थळे इथेच संपत नाहीत तर दोघेही हाडाचे पत्रकार, संपादक. मात्र या दोघांतून लोकसभेत विस्तव जात नव्हता. मेहताब व सत्पथी यांच्यातील रस्सीखेचीच्या राजकारणाची ही अखेर समजायची की सत्पथी खरोखरीच पुन्हा संपादकपदाच्या खुर्चीत बसतील अशी अपेक्षा बाळगायची, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.