ताजमहाल हा हिंदू राजाने बांधल्याचा दावा, उच्च न्यायालयाकडून पुरातत्व विभागाला पडताळणीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातलं एक अनोखं आश्चर्य आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी वास्तू म्हणजे ताजमहाल. पर्यटकांमध्ये ताजमहालाचं आकर्षण जितकं आहे, तितकाच त्याच्या स्थापनेविषयीचा वादही आहे. आधीच ताजमहाल हे जुनं शिवमंदिर असल्याचा दावा केला जात होता, त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे.

ताजमहाल हा मुघल बादशहा शाहजहान याने बांधला नसून तो मूळ हिंदू राजा मान सिंग याने बांधला असल्याचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाला पडताळणी करण्यासाठी लक्ष घालण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही जनहित याचिका हिंदू सेना नावाच्या संघटनेने दाखल केली होती. त्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्या. तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

हिंदू सेनेचे अध्यक्ष सूरजित सिंह यादव यांनी केलेल्या दाव्यानुसार, ताजमहाल हा मूळचा राजा मानसिंग याचा वाडा होता, त्यात बदल करून शाहजहान याने आपलं नाव दिलं होतं. शाहजहान याची पत्नी मुमताज महल हिच्या मृत्युनंतर दफन करण्यासाठी शाहजहान याला एक रम्य, शांत जागा हवी होती. त्यामुळे त्याने त्यावेळी राजा जयसिंग याच्या ताब्यात असलेल्या मानसिंगाच्या वाड्याची निवड केली. त्यामुळे हा महाल शाहजहान याने बांधला असल्याचा जो उल्लेख शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये केला जातो, तो ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा हिंदू सेनेने केला होता.

या युक्तिवादावर निर्णय देताना न्यायालय म्हणालं की, याचिकाकर्त्यांनी यापूर्वी याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाने लक्ष घालावं, असे आदेश देत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.