
सागर धनखड हत्याकांडातील आरोपी, पैलवान सुशीलकुमारला शुक्रवारी मंडोलीच्या तुरुंगातून तिहार तुरुंगात शिफ्ट करताना दिल्ली पोलिसांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. जवळपास अर्धा डझन पोलिसांनी त्याच्यासोबत फोटोसेशन केले. हे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हत्येच्या आरोपीसोबत केलेल्या पह्टोसेशनमुळे दिल्ली पोलीस अडचणीत सापडले आहेत.
तिहार तुरुंगात डांबण्यापूर्वी पोलिसांनी सुशीलकुमारला सेल्फीबाबत विनंती केली. त्यावर सुशीलकुमारने पोलिसांना निराश केले नाही. त्याने अगदी चेहऱयावर स्माईल ठेवत पोलिसांना सेल्फी काढण्यास वेगवेगळ्या पोझ दिल्या. सुशीलकुमारने लाल रंगाचे टी शर्ट घातले होते. कैद्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक तसेच काही पोलीस सिव्हील ड्रेसवर हातात शस्त्र घेऊन उभे असल्याचे व्हायरल छायाचित्रांमध्ये दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपीसोबत अशाप्रकारचे फोटोसेशन कसे काय केले, असा सवाल केला जात आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर पैलवान सागर धनखडला बेदम मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात रोहिणी न्यायालयाने सुशीलकुमारसह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 9 जुलैपर्यंत वाढ केली आहे.
गँगस्टर जठेडीपासून सुशीलकुमारला धोका
सुशीलकुमारला मंडोलीच्या 15 नंबर तुरुंगातून तिहारच्या तुरुंग क्रमांक 2 मध्ये हलवले आहे. प्रशासनाने ही रुटीन प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. मात्र सुशीलकुमारला दुबईतील गँगस्टर काला जठेडी ऊर्फ संदीप कालापासून धोका असल्याचे वृत्त आहे. सागर धनखडला मारहाण झाली, त्यावेळी सागरसोबत सोनू महाल होता. सोनू हा मारहाणीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून तो गँगस्टर काला जठेडीचा भाचा आहे. गुन्हेगारी विश्वात काला जठेडीचे नाव आघाडीवर आहे.




























































