
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पुरती गारठून गेली. दिल्लीतील तापमानाने गेल्या पंधरा वर्षांचा विक्रम मोडला. सफदरजंग वेधशाळेत दिल्लीचे तापमान आज 1.1 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले. तापमानाचा पारा इतका खाली घसरल्याने नववर्षारंभीच राजधानीत दाट धुके पसरून वाहतूक मंदावली.
यापूर्वी 8 जानेवारी 2006 रोजी दिल्लीतील किमान तापमान 0.2 डिग्री सेल्सियस झाले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 2.4 डिग्री होते अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक कुलदीप श्रीवास्तव यांनी दिली. दाट धुक्यामुळे 50 मीटरपर्यंतचे काहीच दिसत नव्हते असे आजचे वातावरण होते. 6 जानेवारीपर्यंत असेच वातावरण राहील असे श्रीवास्तव म्हणाले. 3 ते 5 जानेवारी दरम्यान तुरळक पाऊसही होण्याची शक्यता आहे.



























































