दिल्ली-पंजाब आमनेसामने, राहुल-अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार

आयपीएलमधील दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये उद्या रंगणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमध्ये उभय संघांमध्ये खडाजंगी होईल. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल व दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हे दोघेही हिंदुस्थानसाठी सध्या खेळत आहेत. याप्रसंगी दोघांच्या नेतृत्वगुणाचा कस लागणार हे निश्चित. तसेच अनिल कुंबळे व रिकी पाँटिंग या दोन दिग्गज व्यक्तींचा अनुभवही यावेळी पणाला लागणार आहे. प्रशिक्षक म्हणून ते कशी कामगिरी करतात हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

दिल्लीला ऍडव्हाण्टेज
दिल्ली कॅपिटल्स संघाने अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. तसेच एकदाही फायनलचे तिकीट बुक त्यांना करता आलेले नाही. पण गेल्या मोसमात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने तिसरे स्थान पटकावले आहे. साखळी फेरीत त्यांना 9 लढतींमध्ये विजय मिळवता आला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आव्हान संपुष्टात आले. किंग्ज इलेव्हन पंजाबची मात्र गेल्या मोसमात सहाव्या स्थानावर घसरण झाली होती. नऊ लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र सध्या तरी दिल्ली कॅपिटल्सकडे उद्याच्या लढतीसाठी ऍडव्हाण्टेज असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अजिंक्य रहाणे बेंचवरच बसणार…
हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सलामीच्या लढतीत बेंचवर बसण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांची दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन सलामी फलंदाज म्हणून निवड करतील. दोघांपैकी कोणालाही सातत्याने अपयश आल्यास अजिंक्य रहाणेची सलामी फलंदाज म्हणून वर्णी लागू शकते. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर, शिमरोन हेथमायर, रिषभ पंत या फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागणार आहे. अजिंक्य रहाणेला मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णयही दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन घेऊ शकते.

गेल, मॅक्सवेल तारणहार
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ख्रिस गेल व ग्लेन मॅक्सवेल हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तारणहार बनू शकतील. अनिल कुंबळे व लोकेश राहुल या जोडगोळीवर यंदाच्या आयपीएलमध्ये प्रचंड दबाव असणार आहे. मोहम्मद शमी, मयांक अग्रवाल, सरफराज खान या हिंदुस्थानातील स्टार खेळाडूंच्या कामगिरीवरही साऱयांच्या नजरा असतील.

संभाव्य उभय संघ खालीलप्रमाणे
किंग्ज इलेव्हन पंजाब – लोकेश राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, शेल्डॉन कॉटरेल/ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, इशान पोरेल.

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिमरोन हेथमायर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टोयनीस, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा.

आपली प्रतिक्रिया द्या