
सातारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असल्याने अनेक तालुक्यांत साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. जिह्याभरात डेंग्यू व चिकुनगुणियाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागासह शहरातही साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरेगाव, खटाव व कराड या तालुक्यांत 87 रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यू व चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने औषध फवारणीसह घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पाऊस सुरू झाल्यानंतर जिह्यात डेंग्यूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने चिंतेत भर पडत आहे. यावर आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील वाढता फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम राबवली जात आहे. खटाव, कोरेगाव व कराड तालुक्यांतील रेठरे व इतर काही गावांमध्ये डेंग्यू व चिकुनगुणियाचे 87 रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पिण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत. आठवडय़ातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवावीत. शिवाय घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून देऊ नका, पाणी साठविण्यात आलेली भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवणे, घराभोवती व परिसरामध्ये सांडपाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, सर्व पाणीसाठय़ांना घट्ट झाकण बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, परिसरातील खराब टायर, फुटके प्लॅस्टिक कॅन, डबे नष्ट करावे आदी उपाययोजना करण्याची गजर आहे. त्यानुसार जिह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱया डेंग्यू तापसदृश्य रुग्णांची माहिती हिवताप कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.




























































