गावातील एकमेव ब्राम्हण कुटुंबाला ठार मारले, गरीबीशी झुंजणाऱ्या कुटुंबाचा करुण अंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील देवरियामधल्या फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 5 जणांना ठार मारण्यात आलं आहे. सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या घरातील 5 जणांना गावातील यादव समुदायाने ठार मारले आहे. दुबे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत सामान्य होती. दुबे यांना 5 मुले होती ज्यातील एका मुलीचे लग्न झाले असून तिच्या दोन लहान बहिणी शाळेत शिकतायत. दुबे यांचा एक मुलगा पौरोहित्य करतो तर सगळ्यात लहान मुलगा हा 8 वर्षांचा आहे. दुबे यांचे कुटुंब 3 खोल्यांच्या घरात राहात होते, या घराला कडी सोडा दरवाजासुद्धा नाहीये. हत्याकांड घडले तेव्हा दुबे यांचा मोठा मुलगा देवेश हा पौरोहित्यासाठी गावाबाहेर गेला होता. ज्या गावात दुबे कुटुंब राहात होते त्या गावात यादव समाज मोठ्या संख्येने राहतो. इतकंच नाही तर आसपासच्या गावांमध्येही यादवांचे प्राबल्य आहे.

असं सांगितलं जातंय की जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडलं आहे. हत्याकांडानंतर पोलीस मोठ्या संख्येने या गावात आले असून गृहसचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी हे देखील या गावात पोहोचले होते. हल्लेखोरांनी दुबे यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी महिला, लहान मुलांनाही सोडलं नाही. त्यांनाही अत्यंत निर्घृणपणे ठार मारलं. महिला मुलांना हल्लेखोरांनी दांडक्यांनी मारहाण केली, गळे चिरले आणि नंतर गोळ्या घालून ठार मारले. हल्लेखोरांनी हल्ला केला असता दुबे यांची बायको हात जोडून आम्हाला सोडा, असं म्हणत हात जोडून उभी होती. तिच्यावर गोळी झाडून तिला मारण्यात आले. दुबे यांची तीनही मुले भीतीने रडत होती आणि ती देखील हात जोडून आपल्यावर दया करावी यासाठी याचना करत होती. त्यांनाही ठार मारण्यात आलं. सगळ्यात लहान मुलगा अनमोल मेला असावा असं समजून त्याला सोडूनव देण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.