5 लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक

वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी सरकारकडे भरणा करावे लागणारे चालान देण्यासाठी महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यास निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्यासाठी तब्बल 5 लाखांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर या दोन लाचखोरांना अटक करण्यात आली.

शहरालगत असलेल्या तीसगाव येथील गट नंबर 225/5 मध्ये 6 एकर 16 गुंठे ही वर्ग 2 ची जमीन दोघाजणांनी भागीदारीत विकत घेतली. सरकारच्या परवानगीने आणि नियमानुसार या जमिनीचे खरेदीखत 2023 मध्ये करण्यात आले. मात्र, ही जमीन वर्ग 2 मध्ये असल्याने या जमिनीला वर्ग 1 मध्ये आणण्यासाठी सरकारकडे शुल्क भरणा करावे लागते. यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱयाने जमीनमालकाकडे 18 लाख रुपयांची लाच मागितली. महसूल सहायक दिलीप त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकाऱयांशी बोलून तडजोड करून लाचेची रक्कम कमी करता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या जमीन मालकाला सांगितले आणि चालानसाठी कार्यवाही करण्यापूर्वी 5 लाख आणि त्यानंतर उर्वरित लाचेची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार 26 मे रोजी ठरल्याप्रमाणे 5 लाख रुपये घेऊन जमीनमालक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे सापळा रचून 5 लाखांची लाच घेताना दिलीप त्रिभुवन यास रंगेहाथ पकडले.