
सामना ऑनलाईन । अजमेर
उत्तराखंडमधील 72 वर्षांचे मोहम्मद अहमद आपल्या नावाआधी देशप्रेमी हा शब्द लावतात. आता ते देशप्रेमी मोहम्मद अहमद या नावाने ओळखले जातात. देशासाठी त्यांनी शांततेचा संदेश देत हिंदुस्थान भ्रमण करण्याचे व्रत हाती घेतले आहे. तेच त्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट्य झाले आहे. देशातील विविध शहरात जाऊन राष्ट्रीय एकता, बंधूभाव, शांतता आणि जीवहत्या, स्त्रीभ्रृण हत्या रोखण्याचा संदेश ते देतात. रविवारी अहमद सायकलने अजमेरमध्ये पोहचले आणि आपला संदेश देण्यासाठी त्यांनी जनजागृतीला सुरुवात केली.
थकलेले शरीर, कृश देहयष्टी तरीही उत्साह आणि उमेद कोणत्याही तरुणाला लाजवेल अशी मोहम्मद यांची ओळख बनली आहे. कोणत्याही शहरात गेल्यावर ते स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतात. त्यांना आपल्या मोहिमेची माहिती देऊन एका वहीत त्या अधिकाऱ्याचा अभिप्राय लिहून घेतात. अजमेरमध्येही त्यांनी अधिकाऱ्यांचा अभिप्राय लिहून मोहिमेला सुरुवात केली. त्यांच्या वहीत देशभरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचे अभिप्राय आहेत. त्यामुळे मोहिमेतील उत्साह वाढत असल्याचे मोहम्मद यांनी सांगितले.
1965 च्या युद्धात हिंदुस्थानी सैनिकांना ट्रकमधून सामग्री पोहचवण्याचे काम मोहम्मद करत होते. युद्धानंतर त्यांनी चालक पदाचा राजीनामा दिला आणि देशकार्यासाठी स्वतःला झोकून दिले. देशातील भांडणे, जातीभेद, भ्रष्टाचार, जीवहत्या यांनी ते व्यथीत होत असत. त्यामुळे या गोष्टी रोखण्यासाठी त्यांनी पुढकार घेण्याचे ठरवले. 1 जानेवरी 2002 मध्ये त्यांनी सायकलवरून हिंदुस्थान भ्रमण करत शांततेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेची सुरुवात झाली. त्यांच्या सायकलवर पुढील भागातील बोर्डवर संदेश लिहिला आहे. राष्ट्रीय एकता शांती संदेश- दहशतवाद, भ्रष्टाचार, जीवहत्या, गोहत्या, नशामुक्ती मोहिम, स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी सायकलयात्रा सुरू आहे असे त्या संदेशात लिहिले आहे. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध शहरात त्यांनी प्रवास केला आहे. ते दररोज 60 किलोमीटरचे अंतर कापतात. आतापर्यंत त्यांनी 19 लाख किलोमीटरचे अंतर कापले आहे.
राजस्थानमध्ये जनजागृती केल्यानंतर ते मुंबईत येणार आहेत. मुंबईत यात्रेची समाप्ती केल्यानंतर जहाजाने हज यात्रेला जाण्याचा त्यांचा मानस आहे. आतापर्यंतच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांची शांतता यात्रा सुरु आहे. एकदा अपघातात त्यांचा पाय फ्रक्चर झाला होता. तर सायकलमध्ये ठेवलेला मोबाईल, पैसे आणि कागदपत्रे चारी झाली होती. दिवसभर शहरात जनजागृती केल्यानंतर रात्री जवळच्या एसटी स्ट्रडवर मुक्काम करून सकाळी त्यांचा प्रवास परत सुरू होतो. वयाने थकलो असलो तरी उमेद कायम आहे. देशात कायम शांतता नादांवी यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलल्याचे मोहम्मद सांगतात.
























































