
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील महत्त्वाचा कुशावर्त तलाव लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. त्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी ३५ मजूर आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी रखरखत्या उन्हात काम करीत आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुशावर्त तलाव कात टाकणार असल्याने किल्ले रायगडाच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
कुशावर्त तलाव हा रायगड किल्ल्यावरील महत्त्वाचा ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाच्या शेजारीच सुमारे ४०० वर्षे दगडी पर्जन्यमापनाचे यंत्र आहे. शिवकाळामध्ये पाऊस मोजण्यासाठी त्याचा वापर होत असे. रायगडावर कुशावर्त, गंगासागर व हत्ती तलाव हे मुख्य पाण्याचे स्रोत समजले जातात. त्यातील हत्ती तलाव कोरडाठाक पडल्याने कुशावर्त तलावातील गाळ काढण्याचे काम पुरातत्व सर्वेक्षण मंडळाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुरू केले आहे.
भिंतीचीही डागडुजी
कुशावर्त तलावातील गाळ काढल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे जलरोधिकरण करण्यात येणार आहे. तलावाची संपूर्ण भिंत स्वच्छ करून पोलिसिरॅमिक आणि चुना या मिश्रणाने ग्राऊटिंग करण्यात येईल. तसेच बांधकामातील कमकुवत भागाचे मजबुतीकरण करून सांधेदेखील भरले जाणार आहेत.




























































