मुंबईतील विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विकासाबरोबरच सुशोभीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. ही कामे आंतराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षा पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केली.

या कामांच्या अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सुशोभीकरणाच्या  कामाचा शुभारंभ  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कलानगर जंक्शन येथे झाला. ‘एमएमआरडीए’चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.

मुंबईत अधिक सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या महामार्गावर लँडस्केप, नवे बसस्टॉप, हॉर्टिकल्चर, सौंदर्यीकरण, पर्यावरण पूरक टॉयलेटस् अशा अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाहतुकीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा व सुखकर होईल. हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. याच धर्तीवर पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबईला पूर्व पश्चिम जोडणाऱया रस्त्यांवरही विकास आणि सुशोभीकरण केले जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. लक्ष्य मीडिया ग्रुपच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे.