
कायद्याला मूठमाती देऊन सत्तेचे सिंहासन उबवणार्या मिंधे सरकारला गेल्या वर्षभरात साधा मंत्रिमंडळाचा विस्तारही करता आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा होरा व्यक्त केला आहे. केंद्राच्या विस्ताराशी आम्हाला काही देणेघेणे नाही, आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातच रस असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जुलैमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले. याच अनुषंगाने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वस्वी हक्क हा मुख्यमंत्र्यांचा असून तेच निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले.

























































