
वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या बंदराचा विकास करताना स्थानिक मच्छीमार, शेतकरी यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक तो निधी व यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
वाढवण बंदरात स्थानिक शेतकरी व मच्छीमारांचा विरोध होत असल्याबाबत सदस्य कपिल पाटील, सचिन अहिर, विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत वाढवण बंदर हे मोठे बंदर म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तिथे मासेमारी करण्याकरिता अत्याधुनिक फिशिंग हार्बर तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. याव्यतिरिक्त मच्छीमारांसाठी विशेष योजना राबविण्यात येतील. या योजनांच्या माध्यमातून मच्छीमारांना अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मासेमारी वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.




























































