
महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या मिंधे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा आव आणला जात असला तरी मुख्यमंत्रीपद हातातून गेल्याने भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्रीपदावर डोळा असलेल्या भाजपकडून एकनाथ शिंदे यांची ‘खाट’ टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दिशेने पावले टाकण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिले आहेत.
विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे असून त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. छत्रपती संभीजनगरमधील समर्थनगर भागातील आयएमए हॉलमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. भाजपच्या या भूमिकेमुळे ठाण्यातील मिंधे गटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा राग बावनकुळे यांनी पहिल्यांदाच आळवलेला नाही. याआधीही त्यांनी अनेकदा याबाबत सूचक विधानं केलेली आहेत. गेल्या वर्षी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली होती. फडणवीस हे जातीपातीपलीकडचे नेते आहेत. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे बावनकुळे म्हणाले होते.
View this post on Instagram
भाजपचं ट्विट अन् मिंध्यांची हवा टाईट
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपने ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग साइटवर देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ या शीर्षकाखाली ट्विट करून चर्चेला तोंड फोडले होते. यापूर्वी पुन्हा येईन म्हणूनही त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले होते. ‘गावांना जलयुक्त करण्यासाठी… शहरांचा चेहरा बदलण्यासाठी… माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,’ असे फडणवीस या व्हिडीओत म्हणत आहेत. मात्र या ट्विटमुळे मिंधे गटाची हवा तंग झाल्याने भाजपने तासाभरातच ही पोस्ट एक्सवरून हटवली.

























































