
सामना प्रतिनिधी, नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा प्रस्ताव आला, त्यावेळी केंद्र आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. इंदू मिलची जागा हडपण्याचा काँग्रेसचा डाव होता, त्यामुळेच ही जमीन स्मारकासाठी देण्यास तत्कालीन सरकार टाळाटाळ करीत होते, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात बोलताना केला.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, इंदू मिलची जागा हडपण्याचा काँग्रेसचा डाव आमचे सरकार आल्यावर हाणून पाडण्यात आला. तीन दिवसांत जागा स्मारकासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय झाल़ा काँग्रेसच्या बोलण्यात आणि कृतीत नेहमीच फरक असतो. आम्ही कमी बोलतो मात्र करून दाखवितो. काँग्रेस आणि आमच्यात नेमका हाच मूलभूत फरक राहिलेला आहे, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
अनुसूचित जातींचा मतपेढी म्हणून वापर केला
काँग्रेसच्या राजवटीतील 55 वर्षे आणि भाजपच्या दहा वर्षातील राजवटीची तुलना केल्यास काँग्रेसने अनुसूचित जातींसाठी काहीही न करता नेहमीच मतपेढी म्हणून त्यांचा वापर केल़ा असा आरोप करताना काँग्रेसचे काही नेते तर या जातींचे ठेकेदार बनले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेबांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करणाऱया, त्यांना संविधान सभेपासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱया काँग्रेसला त्यांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे काय, असा सवाल त्यांनी केला.






















































