
देवगड समुद्रकिनारी 1 एप्रिल रोजी मॉर्निंग वॉकच्या वेळी काही ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची पिल्ले किरण पांचाळ, अमित गोळवणकर व सुवर्णा देवगडकर दृष्टीस पडली. ही पिल्ले मागील 2 ते 3 दिवसांपासून काही स्थानिकांच्या दृष्टीस पडत होती. त्यांच्या घरट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता घरटे सापडत नव्हती. घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले कावळे आणि कुत्रे यांच्या भक्षस्थानी पडताना स्थानिकांना दिसली.
अनेक प्रयत्नांनंतर बाहेर आलेल्या पिल्लांच्या ठशांचा मागोवा घेत कासवाचे घरटे सापडले. हळुवारपणे या खड्ड्यांमधील वाळू बाजूला करत असताना कासवाची पिल्ले दिसायला लागली. काही पिल्ले नुकतीच अंड्यातून बाहेर पडत होती. या पिल्लांना हळुवारपणे बाहेर काढून एका टबमध्ये ठेवण्यात आले. ही कासवाची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यास सतीश देवगडकर, सुरज देवगडकर,अजित टाककर, विकी देवगडकर, विनोद देवगडकर, विनोद सावंत, केदार बिडये,अर्णव कांबळे, भालचंद्र पारकर या स्थानिकांनी मदत केली. देवगड किनारपट्टीवर अशा प्रकारची कासवे आढळल्यास किरण पांचाळ 7208546779, अजित टाककर, 9175296388 या क्रमांकावर संपर्क साधावा. आणि या दुर्मिळ प्रजातीच्या समुद्री कासवाच्या संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन प्राणीमित्रांनी केले आहे.


























































